Ashok Pandit criticized on Shilpa Shinde  pudhari photo
मनोरंजन

Ashok Pandit on Shilpa Shinde | लैंगिक छळाच्या खोट्या आरोपांवरून शिल्पा शिंदेवर कडक टीका; अशोक पंडितांनी मांडले परखड मत

Ashok Pandit on Shilpa Shinde | 'खोटे आरोप खऱ्या पीडितांचे नुकसान करतात', खोट्या आरोपांमुळे शिल्पा शिंदेवर अशोक पंडित यांची कडक टीका

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री शिल्पा शिंदे यांनी एका पॉडकास्टमध्ये निर्माता संजय कोहली यांच्याविरोधात पूर्वी केलेली लैंगिक छळाची तक्रार खोटी असल्याचे सांगितल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावर चित्रपट निर्माते आणि FWICEचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खोट्या आरोपांमुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि करिअर धोक्यात येते, तसेच खऱ्या पीडितांवरील विश्वासही कमी होतो, असे त्यांनी म्हटले. सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून अनेकांनी शिल्पा शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

'भाभीजी घर पर हैं!' मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्यावर केलेले लैंगिक छळाचे आरोप खोटे असल्याची कबुली अभिनेत्री शिल्पा शिंदेने दिली आहे. यानंतर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी शिल्पा शिंदे यांच्यावर केलेली टीका ही प्रामुख्याने खोट्या आरोपांमुळे एखाद्या व्यक्तीची होणारी मानहानी याच्याशी संबंधित आहे.

पंडित यांच्या मते, खोट्या आरोपांमुळे केवळ संबंधिताची प्रतिष्ठा आणि कारकीर्दच धोक्यात येत नाही, तर समाजात खऱ्या पीडितांबद्दल असलेला विश्वासही कमी होतो. या प्रकरणाने मनोरंजन सृष्टीत जबाबदारी आणि न्याय प्रक्रियेवर मोठी चर्चा सुरू केली आहे. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शिल्पाच्या या कृतीचा तीव्र निषेध करत पंडित म्हणाले की, जेव्हा आरोप लावले जातात, तेव्हा त्या व्यक्तीची प्रतिष्ठा, कारकीर्द आणि वैयक्तिक आयुष्याचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते.

'भाभीजी घर पर हैं!' मालिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री शिल्पा शिंदेने निर्माता संजय कोहली यांच्याविरोधात पूर्वी केलेला लैंगिक छळाचा आरोप खोटा असल्याचे एका पॉडकास्टमध्ये सांगितल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तसेच मनोरंजन क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

एका मुलाखतीत अशोक पंडीत म्हणाले की, जर शिल्पा शिंदे यांनी केलेला खुलासा खरा असेल, तर अशा कृतीचा कठोर निषेध होणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, लैंगिक छळासारख्या गंभीर आरोपांचा वापर वैयक्तिक किंवा व्यावसायिक मतभेद मिटवण्यासाठी करणे चुकीचे असून त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.

अशोक पंडित पुढे म्हणाले की, एखादा निर्माता शोसाठी आणि त्याच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शांत राहण्याचा निर्णय घेतो. पण याचा अर्थ असा होत नाही की, खोटे आरोप करणाऱ्यांना मोकळीक मिळाली. अशा घटनांमुळे समाजात संशयाचे वातावरण निर्माण होते. वैयक्तिक फायद्यासाठी एखाद्याची प्रतिष्ठा धोक्यात घालणे हे निंदनीय असल्याचे ते म्हणाले.

वादाची पार्श्वभूमी काय?

अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये शिल्पा शिंदेने सांगितले की, मानधनाच्या वादातून तिने निर्माता संजय कोहली यांच्याविरोधात केलेली लैंगिक छळाची तक्रार खरी नव्हती. तिच्या या कबुलीनंतर सोशल मीडियावर चर्चा झाली. अभिनेत्री हिना खानही म्हणाली, सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये तिने म्हटले की, "आपण स्वतःचीच थट्टा करून घेत आहोत."

शिल्पा शिंदेचे स्पष्टीकरण

दरम्यान शिल्पा शिंदेने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हटले की, अनेकांनी तिच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. घटना समजून न घेता लोक प्रतिक्रिया देत असल्याचेही तिने म्हटले.

नेटकरी म्हणताहेत-

अनेक लोक खोट्या आरोपांमुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर, प्रतिष्ठेवर आणि कारकिर्दीवर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. आणि अशा प्रकारच्या खोट्या कबुलीमुळे समाजात छळवणूक आणि अत्याचाराच्या खऱ्या प्रकरणांमधील पीडितांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT