ASHA Marathi Movie pudhari photo
मनोरंजन

ASHA Marathi Movie : लखलखती आशा...स्त्रियांच्या भावविश्वाचे यथार्थ चित्रण

ASHA Marathi Movie : दिग्दर्शक दीपक पाटील यांनी आरोग्य सेवेच्या पाईक असलेल्या आशा वर्करच्या कामाचे महत्व साध्या आणि सोप्या कथेतून अधोरेखित केले

पुढारी वृत्तसेवा

ASHA worker inspirational story

अनुपमा गुंडे

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही देशात आरोग्याचे प्रश्न आजही ज्वलंत आहेत. स्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून रोजी - रोटीची क्षेत्रे पादाक्रांत करत असल्या तरी आरोग्याच्या बाबतीत त्यांच्या शारिरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची हेळसांडच होते, हे वास्तव अगदी महानगरांपासून ते गावपाड्यापर्यंत आजही आहे. त्यामुळे स्त्री सक्षम झाली तर घराचा सर्वांगिण विकास होतो, याचे महत्व केवळ अर्थिक गणिताच्या पुरतेच मर्यादित आहे.

आजही हजारो स्त्रिया कुटुंबाची खानपान सेवा सांभाळतांना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे बाळंतपणानंतर भारतात माता आणि बालमृत्यूचे प्रमाण प्रगत देशाच्या दृष्टीने आशादायी नाही. देशाच्या आरोग्य यंत्रणेचा मुलभूत कणा असलेल्या आशा वर्कर, आशा सेविका...अशाच एका आशा सेविकेने छोट्या कृतीतून केलेल्या क्रांतीची गोष्ट आहे.

आशा मालती (रिंकू राजगुरू) ही आशा वर्कर. घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत तन्मयतेनं देशसेवेचे व्रत मानून आशा वर्कर म्हणून धुळे जिल्ह्यातील साक्रीतल्या पिंपळखेर सारख्या ग्रामीण भागात काम करते. तिच्या या कामाच्या स्वरूपामुळे आणि तिच्या कामाच्या प्रतीच्या निष्ठेने तिचे कौतुक होण्याऐवजी ती कुटुंबाला प्राधान्य देत नसल्याने तिची अवहेलना होते आहे.

नवरा निलेशच्या (साईनाथ कामत) खंबीर पाठिंब्यामुळे ती हे कर्तव्य तुटुपुंज्या मानधनात निष्ठेने पार पाडते आहे. गावातल्या अल्पवयात लादलेल्या गर्भारपणात एका तरूणीचा मृत्यू होतो. या मृत्यूने मालती हेलावून जाते. गावातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील कमला (शुभांगी भुजबळ) हिच्यावर मुलाच्या अपेक्षेने तिसऱ्यांदा मातृत्वाचे ओझे लादले जाते. त्यात गावातल्या दवाखन्यात गेल्यावर मुलीच जन्माला येतात,

या अंधश्रध्देने कमलाचे बाळंतपण घरातच करू इच्छिणारी सासरची निर्बुध्द माणसे कमलाच्या शारीरिक वेदना त्यांच्या गावीही नसतात. या सगळ्या जंजाळात कमलाला औषधोपचार देण्यासाठी आणि तिचे बाळंतपण दवाखान्यात करण्यासाठी मालती गावातल्या खमक्या रखमा (उषा नाईक) आणि आशा वर्कर (दीक्षा दानाडे) काय संघर्ष करतात, याची ही कथा आहे.

दिग्दर्शक दीपक पाटील यांनी आरोग्य सेवेच्या पाईक असलेल्या आशा वर्करच्या कामाचे महत्व साध्या आणि सोप्या कथेतून अधोरेखित केले आहे. ही कथा सांगतांना त्यांनी वर्षानुवर्षे आशा सेविकांचे प्रलंबित प्रश्नांसाठी निघणारे मोर्चे, त्यांचे प्रश्न आततायीपणे मांडले नाहीत. जीवन देणाऱ्या आईच्या आरोग्याचे महत्व कुटुंबातील अंधश्रध्दा, वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा असा अट्टाहास, पुरूषप्रधानता हे भारतीय कुटुंबजीवनातील प्रश्न आजही किती बाईच्या आरोग्यासाठी किती जीवघेणे ठरतात, आणि त्यात आशा सेविकांचे काम हे पणतीच्या स्वरूपात पण बाईला आई म्हणून उभं करण्यात किती महत्वाचे आहे, हे त्यांनी फार सुरेखपणे कथा आणि दिग्दर्शनातून उलगडले आहे.

एका बाजूला पुरूषप्रधान संस्कृती. तर दुसऱ्या बाजूला कमावत्या स्त्रीला साथ देणारा नवरा, जगाच्या टोमणेबाजीमुळे सुनेवर नाराज असणारी पण वेळेला तिला साथ देणारे कुटुंब अशा दोन परस्परविरोधी कुटुंबाचे चित्रण चित्रपटात आहे. अतिशय तुटपुंज्या मानधनात तेही वेळेवर न मिळणारे, सरकारी कर्मचार्यांच्या दर्जा मिळावा म्हणून लढणाऱ्या आणि डोक्यावर कामाचा बोजा असलेल्या आशांचे प्रश्न आणखी थोडे विस्ताराने मांडण्याची गरज होती.

बाकी रखमाच्या भूमिकेत उषा नाईक यांची खमकी गाववाली तर आशा वर्करचे पोटतिडकीचे प्रतिनिधक चित्र उभं करण्यात रिंकू राजगुरू यशस्वी ठरली आहे. सर्वच कलाकारांनी आपआपल्या भूमिका चोख वठवल्या आहेत. समाजाच्या छोट्या घटकाच्या पण देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असणाऱ्या आशा वर्करच्या दुर्लक्षित विषयाला चित्रपटाने हात घातला आहे, त्यामुळे भरभक्कम पगार घेवून सरकारी खुर्च्या उबवणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यानी या लखलखत्या आशांचे चित्रण पहायलाच हवे असे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT