पुणे : चित्रपट क्षेत्रात ब्लॅक अँड व्हाइट काळापासून आत्ताच्या एआयपर्यंत झालेल्या विविध बदलांची मी साक्षीदार आहे. मी आजही चित्रपट पाहते; पण माझ्या दृष्टीने ब्लॅक अँड व्हाइटचा जमाना हा सुवर्णकाळ होता, अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी शनिवारी (दि.16) व्यक्त केली. ‘कोहिनूररत्न’ पुरस्काराने पुणेकरांच्या वतीने माझा सन्मान होत आहे, पुणेकरांनी दिलेला हा पहिला सन्मान आहे, प्रत्येक सन्मानाचा आनंद हा असतोच, अशा शब्दांत त्यांनी पुरस्काराचा आनंद व्यक्त केला. चित्रपट कारकिर्दीत मला ‘मदर इंडिया’ चित्रपटातील भूमिका करायलादेखील नक्कीच आवडले असते, असेही त्यांनी सांगितले. (Pune Latest News)
रविवारी (दि.17) आयोजित कार्यक्रमात आशा पारेख यांना ‘कोहिनूररत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आयोजित विशेष वार्तालापात पारेख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आपल्या चित्रपटप्रवासाबद्दल पारेख म्हणाल्या, मला घरातून विरोध झाला नाही. मला स्वतःहून चित्रपटात काम करण्याची संधी आली आणि मी ती स्वीकारली. गुरू दत्त, राजेश खन्ना, देव आनंद, शम्मी कपूर यांच्याबरोबर मला रसिकांना हिट चित्रपट देता आले. मला अनेक चांगल्या भूमिका करता आल्या. मी आत्तापर्यंत चित्रपट क्षेत्राशी संबंधित विविध संस्थांची पहिली महिला अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यातून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सेन्सॉर बोर्डची अध्यक्षा असताना त्यांच्या नियमांच्या चौकटीत काम करतानादेखील या क्षेत्राकडे पाहण्याची नवीन दृष्टी मिळाली.
पुण्यात आल्यानंतर मी आवर्जून पुरणपोळी खाते तसेच गणेशोत्सवात शनिवार पेठेतील मंडळातील गणरायाचे दर्शन घेते.
आजच्या अभिनेत्री खूप आत्मविश्वासाने काम करीत आहेच. मला दीपिका पादुकोण आवडते.
आत्तापर्यंतचे आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने गेले आहे, खूप काम केले, आनंदी राहायला मला आवडते.
माझे पुण्याशी जुने नाते आहे, माझी आई फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकायची. माझे वडील कामानिमित्त पुण्याला यायचे. या वेळी आई-वडिलांचे पुण्यात प्रेम जुळले आणि त्यांनी लग्न केले. चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्त माझे पुण्यात येणे-जाणे राहिले; पण, येथे घर घेण्याचे स्वप्न अपुरे राहिले, असे आशा पारेख यांनी सांगितले.
जुन्या गाण्यांचे रिमिक्स केलेले मला अजिबात आवडत नाहीत, कारण त्यामधून शब्द हरवलेले दिसतात आणि अवास्तव संगीताचा भडीमार केला जातो. एआयसारख्या तंत्रज्ञानाचा वापर आता काहीसा भीतीदायक वाटतो. कारण त्याचा गैरवापर करून अनेक चुकीच्या गोष्टी केल्या जातात, अशा शब्दांत पारेख यांनी सद्य:स्थितीवर भाष्य केले. तर आपल्याकडचे साहित्य सकस असल्यामुळे त्यावर आधारित असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात, असेही पारेख यांनी नमूद केले.