मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील देदीप्यमान तारा आणि कोट्यवधी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. काल रात्री त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. केवळ एक दिग्गज गायिका म्हणूनच नव्हे, तर एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही त्यांनी जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
आशा भोसले यांना गायनाइतकीच स्वयंपाकाची आणि नवनवीन पदार्थांची प्रचंड आवड होती. त्यांच्या या आवडीचे रूपांतर पुढे एका यशस्वी व्यवसायात झाले. त्यांनी जगभरातील विविध १० देशांमध्ये 'आशाज' (Asha's) या नावाने भारतीय खाद्यपदार्थांची रेस्टॉरंट्स सुरू केली. या रेस्टॉरंट्सच्या माध्यमातून त्यांनी भारतीय चवीला सातासमुद्रापार पोहोचवले.
एका मुलाखतीदरम्यान आपल्या या प्रवासाचा उलगडा करताना त्यांनी सांगितले होते की, दुबई, लंडन आणि मँचेस्टरमध्ये त्यांचे प्रत्येकी एक रेस्टॉरंट आहे, तर बर्मिंगहॅममध्ये दोन आणि कुवैतमध्ये तब्बल पाच रेस्टॉरंट्स कार्यरत आहेत. याशिवाय दोहा, कतर, बहरीन आणि अबू धाबी यांसारख्या मध्यपूर्वेतील देशांमध्येही त्यांच्या रेस्टॉरंट्सनी खवय्यांच्या मनात स्थान मिळवले आहे.
आशाजींनी हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवण्यामागे एक भावनिक कथा दडली आहे. त्यांचा मुलगा आनंद भोसले जेव्हा लहान होता, तेव्हा कामावरून परतल्यावर आशाजी स्वहस्ते त्याच्यासाठी पदार्थ बनवत असत. आईच्या हाताच्या चवीने भारावून गेलेल्या आनंदने तेव्हाच शब्द दिला होता की, "आई, मी मोठा झाल्यावर तुझ्या नावाने रेस्टॉरंट सुरू करेन आणि तिथे तुझ्या रेसिपीनुसार बनवलेले पदार्थ मिळतील." मुलाने दिलेला हा शब्द पुढे सत्यात उतरला. आशाजींना 'शेफ कोट' परिधान करण्याची विशेष हौस होती; हा कोट घातल्यावर एखाद्या महागड्या पेहरावापेक्षाही अधिक आनंद मिळतो, असे त्या अभिमानाने सांगत असत.
१९४३ मध्ये वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी आशाजींनी आपल्या गायन प्रवासाला सुरुवात केली होती. ८ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सर्वाधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार सोसूनही त्यांनी खचून न जाता आपल्या तीन मुलांचा सांभाळ केला. संगीताचा वारसा जोपासतानाच त्यांनी खाद्य संस्कृतीच्या माध्यमातून भारतीय अस्मिता जागतिक स्तरावर तेवत ठेवली. त्यांच्या निधनाने संगीत आणि उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.