'एप्रिल मे ९९' मधील ‘समर हॅालिडे’ गाणे लाँच करण्यात आलं  Instagram
मनोरंजन

April May 99 Film | सुट्टीतील बच्चे कंपनींची धम्माल! 'एप्रिल मे ९९'मधील ‘समर हॅालिडे’ गाणे प्रदर्शित

April May 99 Marathi Film | 'एप्रिल मे ९९'मधील ‘समर हॅालिडे’ गाणे बोमन इराणी यांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले

स्वालिया न. शिकलगार

April May 99 Upcoming Marathi Film

मुंबई :

उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टालजिक सफर घडवणारा ‘एप्रिल मे ९९’ येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटातील उन्हाळ्याची सुट्टी अधिक रंगतदार करणारे 'समर हॅालिडे’ गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हा चित्रपट ज्याप्रमाणे प्रेक्षकांना नोस्टालजिक करणार आहे, अगदी त्याला साजेसे असे या गाण्याचे लाँचिंग करण्यात आले. यावेळी आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद), मंथन काणेकर (सिद्धेश) आणि साजिरी जोशी (जाई) यांनी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य सादर केले तर भूमी प्रधान, रोहन गोखले, रोहन प्रधान यांनी 'समर हॉलिडे' हे गाणे गायले. यावेळी बोमन इराणी यांनी कलाकारांचे कौतुक करत संपूर्ण टीमसोबत मनमुराद गप्पा मारल्या.

एप्रिल मे ची सुट्टी प्रत्येकासाठीच खास असते. धमाल, मस्तीच्या याच काळात चित्रपटातील ‘ समर हॅालिडे' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. काही दिवसांपूर्वीच कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश यांच्या ग्रुपमध्ये जाईची एंट्री झाली असून त्यांची उन्हाळ्याची सुट्टी आता अधिकच मजेदार झाल्याचे दिसत आहे. या गाण्यात कृष्णा, प्रसाद, सिद्धेश आणि जाई समर हॉलिडेजची मजा लुटताना दिसत आहेत. हे गाणे भूमी प्रधान, रोहन गोखले, रोहन प्रधान यांनी गायले असून रोहन - रोहन यांचे संगीत लाभलेल्या हा धमाल गाण्याला प्रशांत मडपुवार, रोहन गोखले यांनी शब्दबद्ध केले आहे.

काय म्हणाले बोमन इराणी?

आपली आठवण शेअर करताना बोमन इराणी म्हणतात, “ राजेश आणि रोहनला मी खूप आधीपासून ओळखतो. दिग्दर्शक म्हणून रोहनचा हा पहिला चित्रपट आहे, त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी गाणे लाँच करून त्यांनी आमच्या मैत्रीच्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. गाणे खूपच सुरेख आहे. या चारही मुलांमधील आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी कमाल अभिनय केला आहे. या गाण्यातून मे महिन्यासातील सुट्टींचा खूप सुंदर काळ उभा करण्यात आला असून ज्यावेळी इंटरनेट, मोबाईल नव्हते, तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी अशीच एन्जॉय केली जायची. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा!''

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “ बोमन सर आणि आमची जुनी मैत्री आहे. ते माझ्या पहिल्या चित्रपटातही होते. खरंतर ते कामात व्यस्त असतानाही ते माझ्या आणि रोहनच्या प्रेमाखातर आज इथे आले. रोहननेही बोमन सरांच्या चित्रपटापासूनच त्याच्या करिअरची सुरुवात केली. त्यामुळे आमच्या खूप आठवणी आहेत. त्यामुळे आज बोमन सर आणि ही जागा हा एक उत्तम मेळ साधला गेला आहे साँग लाँचसाठी. हा चित्रपट प्रेक्षकांना मैत्री, धमाल आणि आठवणींचा सुंदर अनुभव देणार आहे. आपल्यापैकी अनेकांनी अशा प्रकारची सुट्टी एन्जॉय केली असेल. त्यामुळे हे गाणे जुन्या आठवणीत रममाण करणारे आहे.''

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “ आमच्या या नॉस्टेलजियात बोमन सर सहभागी व्हावेत आणि त्यांचे आशीर्वाद मिळावेत, अशी आमची इच्छा होती. सहायक दिग्दर्शक म्हणून मी कामाला सुरुवात केली तो चित्रपट बोमन सरांचाच होता. त्यामुळे तेव्हापासून मी त्याचा प्रवास बघत आलो आहे. त्यांनी कायमच आम्हाला मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे या सगळ्या आठवणी खूप मौल्यवान आहेत. त्यामुळेच या छोटेखानी कार्यक्रमातून आम्ही पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत चित्रपटाचे राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT