Amruta Khanvilkar Separation Rumors : पती हिमांशू मल्होत्रासोबत वेगळे राहत असल्याच्या चर्चेवर अभिनेत्री अमृता खानविलकरने कायदेशीर नोटीस जारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमृता आणि तिचा पती हिमांशू हे गेल्या दीड वर्षांपासून वेगळे राहत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, अमृता किंवा हिमांशू या दोघांनीही अद्याप विभक्त होण्याबाबत किंवा घटस्फोटाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
अमृता खानविलकर यांच्या कायदेशीर टीमने जारी केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, काही ऑनलाईन, सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर कुमारी अमृता खानविलकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आधारहीन, अब्रू नुकसानकारक आणि त्यांच्या गोपनीयतेचा भंग करणारा मजकूर पसरवला जात आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो, परंतु अमृता खानविलकर यांच्याबद्दल बदनामीकारक विधान, अफवा, पडताळणी न केलेले आरोप किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध किंवा शेअर करण्यासाठी या स्वातंत्र्याचा गैरवापर केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.
बदनामकार मजकूर तयार करणाऱ्या, प्रसिद्ध करणाऱ्या किंवा पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध लागू कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा सर्व प्रकारांवर लक्ष ठेवले जात असून त्याची नोंद घेतली जात असल्याचेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
अमृता आणि हिमांशू हे २०१५ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. सध्या वेगवेगळ्या घरांत राहत असले तरी ते अजूनही संपर्कात आहेत. करिअर प्राधान्ये, आर्थिक कारणे आणि आपापल्या कुटुंबांप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे एका सूत्राच्या हवाल्याने नमूद करण्यात आले होते. त्यांच्यात कायदेशीर विभक्त होण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही एका रिपोर्टमध्ये म्टहलं होते.