आलिया भट्टच्या बहुप्रतिक्षित ‘अल्फा’ चित्रपटाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या झलकमध्ये आलियाचा रौद्र आणि अॅक्शनने भरलेला अंदाज पाहायला मिळत असून चाहत्यांना तिचा हा नवा अवतार विशेष आवडला आहे. दुसरीकडे बॉबी देओलच्या भूमिकेबाबत समोर आलेल्या ट्विस्टमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
यश राज फिल्म्सच्या आगामी अॅक्शनपट अल्फाच्या ट्रेलरमध्ये आलिया भट्टच्या रौद्र रुपाची होताच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आलिया भट्ट आणि शर्वरी या दोन अभिनेत्रींच्या केंद्रस्थानी असलेला हा चित्रपट अॅक्शन, रहस्य आणि थराराने भरलेला आहे.
नुकत्याच रिलीज झालेल्या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट एक अत्यंत प्रशिक्षित आणि धाडसी तरुणीच्या भूमिकेत दिसते. ती शत्रूंशी लढताना दिसते, बंदूक चालवताना दिसते. लहानपणापासून कठोर प्रशिक्षण घेतलेल्या या पात्राचा प्रवास आणि तिच्या आयुष्यातील संघर्ष कथानकाचा मुख्य गाभा असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, तिच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गुरूविरुद्धच ती उभी ठाकते, ज्यामुळे कथेला वेगळे वळण मिळते.
बॉबी देओलची भूमिका अल्फाच्या कथेत नवे ट्विस्ट आणणारे आहे. त्याची भूमिका खूप गूढ पण प्रभावी दाखवण्यात आलीय. कथानकातील अनेक रहस्ये तिच्याभोवती फिरताना दिसताहेत. तसेच, अनिल कपूर यांची झलकही पाहायला मिळते.
दरम्यान, शर्वरीच्या भूमिकेबाबत निर्मात्यांनी फारशी माहिती उघड केलेली नाही. मात्र ती आणि आलिया एकत्र येऊन मोठ्या संकटाचा सामना करताना दिसतात. त्यामुळे चित्रपटातील तिच्या पात्राबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.
अॅक्शन सीक्वेन्स, आकर्षक सीन्स आणि वेगळे कथानक यामुळे ‘अल्फा’ हा मोठ्या पडद्यावर यशस्वी ठरेल, असे म्हटले जात आहे. व्हिडिओमधील बॅकग्राउंड म्युझिकनेही विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या डीजे ह्यूगल यांच्या ‘जमैकन बाम बाम’ या गाण्याचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. शिव रवैल यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘अल्फा’ हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.