Boney Kapoor spent Rs 210 crore on Ajay Devgn Maidaan Movie
मुंबई : अजय देवगनचा मैदान चित्रपट का फ्लॉप गेला; याबद्दल खुद्द बोनी कपूर यांनी कारण सांगितलं आहे. एका यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल त्यांनी खुलासा केला. कशाप्रकारे १२० कोटींचे बजेट असेलल्या चित्रपटाचा खर्च २१० कोटी झाला आणि शिवाय तो बॉक्स ऑफिसवर चालला देखील नाही. याबद्दल त्यांनी नुकतेच सांगितलं की, ‘मैदान’ या चित्रपटाच्या वेळी त्यांना खूप तोटा सहन करावा लागला. कारण आधीच कोविड-१९ मुळे हा चित्रपट ४ वर्षांहून अधिक काळ अडकून पडला होता.
बोनी कपूर यांच्या ‘मैदान’ हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी तब्बल ५ वर्षे लागली. आणि अखेर २०२४ रोजी चित्रपट रिलीज झाला. हा एक स्पोर्ट्स ड्रामा होता. निर्मिती प्रक्रियेत खर्च प्रचंड वाढल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आणि ‘मैदान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला.
बोनी कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मैदान’ चित्रपटाचे बजेट होते- १२० कोटी रुपये. मात्र, अनेक अडचणी येत गेल्या, ज्यामुळे हा खर्च २१० कोटी रुपयांवर पोहोचला.
‘मैदान’ चित्रपट तयार होत असताना कोरोना आला. लॉकडाऊनमुळे शूटिंग थांबवावे लागले. चक्रीवादळामुळे तोटा सहन करावा लागला. सेट्स पुन्हा उभारण्यासाठी अतिरिक्त खर्च झाला. शिवाय प्रदीर्घ काळ चित्रपट थांबून राहिल्याने कलाकारांच्या तारखा, तांत्रिक खर्च, उपकरणे यावर भरपूर खर्च झाला. त्यामुळे बजेटवर दुप्पट ताण आला. त्यांच्यावर कर्ज झाले आणि ते फेडण्यासाठी त्यांनी पैसे उधार घेतले होते.
अजय देवगनसारखा स्टार असताना देखील चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. समीक्षकांनी अभिनयाला दाद दिलीच शिवाय कहाणी देखील आवडली. पण प्रेक्षकांना तो फारसा भावला नाही.
बोनी कपूर म्हणाले, ''मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यात चित्रपटातील सामने शूट करायचे होते. सर्व आंतरराष्ट्रीय संघ आले होते. यामध्ये परदेशातील सुमारे २०० ते २५० लोकांचा क्रू होता. ते वेगवेगळ्या देशांचे खेळाडू होते. पण मार्चमध्येच लॉकडाऊन जाहीर झाले आणि शूटिंग थांबले. विमाने रद्द झाली. पण, लॉकडाऊन इतके महिने राहिल, याचा अंदाज नव्हता.''
पुढे बोनी कपूर म्हणाले, ''आम्ही सामन्यांचे शूटिंग करत होतो. तेव्हा आमच्याकडे ८०० लोकांचे युनिट असायचे. पण कोविडमुळे सेटवर फक्त १५० लोकांना येता येत असे. मी संपूर्ण युनिटसाठी ‘ताज’मधून जेवण मागवले. सेटवर चार रुग्णवाहिका आणि डॉक्टर सेटवर ठेवावे लागले. सर्वांना डिस्टिल्ड वॉटर पुरवले जेणेकरून क्रू सुरक्षित वाटावे. पण त्याचे बिल खूप आले. सर्व करूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ६८ कोटी रुपये कमावले.''