बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याच्या शांत आणि गंभीर स्वभावासाठी ओळखला जातो, मात्र चित्रपटाच्या सेटवर तो सर्वात मोठा 'प्रँकस्टर' (खोडकर) आहे. सहकलाकारांची मस्करी करण्यात आणि त्यांना 'एप्रिल फूल' बनवण्यात त्याचा हात कोणीच धरू शकत नाही. मग ते सोनाक्षी सिन्हाला मिरची खायला लावणे असो किंवा शुटिंग दरम्यान बनावट 'आत्मा' असल्याचे भासवून अभिनेत्रींना घाबरवणे असो, अजयचे हे प्रँक्स आजही फिल्म इंडस्ट्रीत चर्चेचा विषय ठरतात.
Ajay Devgn prank on the set
बॉलिवूडमध्ये अजय देवगणची प्रतिमा एक अत्यंत गंभीर, कमी बोलणारा आणि डोळ्यांतून अभिनय करणारा अभिनेता अशी आहे. पण तुम्हाला माहित आहे का? हाच 'सिंघम' कॅमेरा बंद झाला की सेटवरचा सर्वात मोठा खोडकर बनतो. १ एप्रिल म्हणजेच 'एप्रिल फूल'च्या निमित्ताने अजय देवगणच्या सेटवरील असे काही किस्से, वाचा.
सोनाक्षी सिन्हाला खायला लावली तिखट मिरची!
'सन ऑफ सरदार' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. अजय देवगणने सेटवर सर्वांना मिठाई वाटली. त्याने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला एक खास 'गोड पदार्थ' दिला. सोनाक्षीने तो आनंदाने खाल्ला, पण पुढच्याच क्षणी तिच्या डोळ्यातून पाणी आणि तोंडातून वाफा निघू लागल्या. खरं तर, तो गोड पदार्थ नसून अत्यंत तिखट मिरचीची पेस्ट होती. गाजरच्या हलव्यात मिरचीची पेस्ट टाकण्यात आली होती. ज्याला अजयने मिठाईसारखा आकार दिला होता. सोनाक्षीची अवस्था पाहून अजय आणि संपूर्ण क्रू पोट धरून हसत होते. कारण गाजर हलवा देताना अजयने म्हटले होते की, तो आतापर्यंतचा सर्वात उत्तम गाजर हलवा आहे.
भांगचे लाडू खायला लावले
अजयने एकदा सेटवर भांग मिश्रित लाडू खायला लावले. एका मुलाखतीत कॉस्ट्यूम डिजाइनर डॉली अहलूवालियाने देखील अजयचा एक प्रँक शेअर केला होता. त्या म्हणाल्या होत्या, 'ओमकारा'च्या सेटवर अजयने मोठा प्रँक केला होता. तो इतका सीरियस प्रँक केला होता की, काही लोक बेशुद्ध झाले होते. अजयने सेटवर भांग मिश्रित लाडू आणले होते आणि ज्यांनी हा लाडू खाल्ला, ते बेशुद्ध झाले होते.
काजोललाही सोडलं नाही!
खुद्द अजयची पत्नी आणि अभिनेत्री काजोल देखील त्याच्या या खोड्यांपासून वाचलेली नाही. काजोलने एका मुलाखतीत सांगितले होते की, अजय अनेकदा तिला फोन करून सांगतो की, घरी काहीतरी गंभीर घडलंय किंवा कोणीतरी पाहुणे आलेत. काजोल घाबरून घरी पोहोचते, तेव्हा अजय तिथे आरामात बसून टीव्ही पाहत असतो. अजयने एकदा एक्सवर ट्विट केलं की, काजोल देश से बाहर है. उनसे व्हॉट्सॲपर संपर्क करे. यानंतर त्या व्हा२ट्सॲपवर मेसेजचा पाऊस पडला. खरंतर तो नंबर काजोलचा नव्हता. यावर काजोल भडली आणि तिने ट्विट केलं घरी हे सर्व चालणार नाही.
जेव्हा अभिनेत्रीला वाटली भूताची भीती
अजय देवगणने सेटवर 'पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी' किंवा 'आत्मा' असल्याचे खोटे वातावरण तयार केले आहे. एका अभिनेत्रीसोबत (काही रिपोर्ट्सनुसार ती दाक्षिणात्य अभिनेत्री होती) शूटिंग करताना अजयने काही लोकांना सांगून सेटवर विचित्र आवाज काढायला लावले. इतकेच नाही तर खोलीतील वस्तू आपोआप हलतील अशी व्यवस्था केली. ती अभिनेत्री इतकी घाबरली की तिने त्या रात्री शूटिंग करण्यास नकार दिला आणि रडू लागली. नंतर अजयने हसत हसत हा प्रँक असल्याचे सांगितले होते.
रोहित-अजयने केला भन्नाट प्रँक
रोहित शेट्टीने एकदा सांगितलं होतं की, 'मी आणि अजय एकदा एका चित्रपटाचे शूटिंग कर होतो. आम्ही एका महिलेला तिच्या मुलांसह प्रोडक्शन टीमच्या एका मेंबरच्या घरी त्याची पहिली पत्नी बनवून पाठवलं होतं. ज्यामुळे पती-पत्नी यांच्यात भांडण झालं होतं.’
अजय देवगणच्या खोड्या इतक्या हुशारीने प्लॅन केलेल्या असतात की, सेटवरील अनुभवी दिग्दर्शकांनाही त्या खऱ्या वाटतात.