एम. एस. राजू दिग्दर्शित 'अगाध' या मिस्टिक डिव्हाईन थ्रिलरचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यातील भयावह वातावरण, रहस्यमय कथा आणि दमदार दृश्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कामाक्षी भास्करला प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचे प्रदर्शन 14 ऑगस्ट रोजी होणार आहे.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता एम. एस. राजू आपल्या नव्या 'अगाध' या चित्रपटातून प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव घेऊन येत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यातील भयावह वातावरण, रहस्यमय कथा आणि थरारक दृश्यांमुळे सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. हॉरर आणि रहस्यमयी थ्रिलर आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट विशेष ठरेल, असे म्हटले जात आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना एका गूढ आणि अंधाऱ्या जगात नेले जाते. प्राचीन श्रद्धा, अनाकलनीय घटना, अलौकिक शक्ती आणि भीतीदायक प्रसंग दाखवण्यात आले आहेत. प्रत्येक दृश्यासोबत वाढणारा सस्पेन्स आणि अंगावर काटा आणणारे पार्श्वसंगीतामुळे गुढता वाढताना दिसते.
विशेष म्हणजे, चित्रपटाची कथा रिव्हर्स नॅरेटिव्ह अर्थात उलट क्रमाने उलगडत जाते. कथानकाच्या केंद्रस्थानी 'अगाधा' नावाची एक रहस्यमय शक्ती आहे, जी जीवन आणि मृत्यू यांच्यातील अदृश्य समतोल सांभाळत असल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील सीन्स ही ट्रेलरमधील आणखी एक जमेची बाजू म्हणता येईल. अंगावर शहारे आणणाऱ्या पार्श्वसंगीताने संपूर्ण ट्रेलर खूपच भयानक वाटतो.
श्रावण रेड्डी आणि कामाक्षी भास्करला यांची मुख्य भूमिका असणार आहे. त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय आणि गूढ वातावरणातील अभिनय अंगावर शहारे आणणारा आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा एम. एस. राजू यांनी सांभाळली असून, 'श्री आदि वराह प्रॉडक्शन्स'च्या बॅनरखाली काशी विशालाक्षी बालूसू यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजय के.आर. यांनी हा चित्रपट सादर केला असून, तो तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.
राकेश वेंकटपुरम यांनी संगीत, नानी चमिडीशेट्टी यांचे छायांकन, जुनैद सिद्दीकी यांचे संकलन, तर राजीव नायर यांनी प्रॉडक्शन डिझाईन केले आहे. पटकथा चैतन्य वेगे, एनव्हीएन सुब्बाराजू हे कार्यकारी निर्माते आहेत. १४ ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.