मनोरंजन

‘चंद्रमुखी’तील ‘दौलत’ होऊन येणार आदिनाथ कोठारे

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' या चित्रपटाचा टिझर काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर झळकला. खरंतर घोषणेपासूनच हा चित्रपट अनेकांसाठी चर्चेचा विषय होता आणि टिझरनंतर या चर्चांना अधिकच उधाण आले. त्यात टिझरमध्ये कोणत्याच कलाकाराचा चेहरा समोर न आल्याने ही उत्सुकता अधिकच वाढली. टिझरमध्ये पिळदार शरीरयष्टी असणारा पाठमोरा 'तो' ध्येयधुरंदर राजकारणी दिसत आहे. हा चेहरा कोण असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. अखेर या प्रश्नाला पूर्णविराम देत ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आली आहे. दौलत देशमाने असे या चित्रपटातील पात्राचे नाव आहे. या दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. आदिनाथ कोठारे हा मराठमोळा अभिनेता महाराष्ट्राची लोककला जपणारं पात्र साकारणार आहे.

महाराष्ट्रातील एक असा नेता जो समाजाच्या हितासाठी, प्रत्येकाला मदत करण्यासाठी तत्पर असणारा, महाराष्ट्राची लोककला जपणारा, त्यांचे हक्क मिळवून देणारा आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी धडपडणारा 'दौलत देशमाने' आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे संगीत आहे. 'चंद्रमुखी' येत्या २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात आपल्या भेटीला येणार आहे.

आदिनाथ या भूमिकेबद्दल म्हणतो, "निर्मिती, दिग्दर्शन, बॉलिवूड चित्रपट केल्यानंतर आता बऱ्याच काळाने आपल्या भाषेत अभिनय करत आहे आणि त्यातही इतकी दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळतेय, त्यामुळे यापेक्षा वेगळा आनंद कोणता असूच शकत नाही. भूमिकेबद्दल सांगायचे तर यापूर्वीही मी राजकारण्याची भूमिका साकारली आहे. मात्र ही भूमिका खूप वेगळी आहे. एक असा राजकारणी ज्याची आयुष्यात काही ध्येय आहेत. तो समाजकल्याणासाठी, हक्कांसाठी लढत, धडपडत आहे. त्याच्या या धडपडीला यश मिळेल का, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. प्रसाद ओक यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव आहे.

व्यक्तिरेखेबद्दलची प्रतिमा त्यांच्या डोक्यात निश्चित असल्याने समोरच्याकडून अपेक्षित आणि उत्तम अभिनय ते करून घेतात. माझ्या या भूमिकेसाठी मी घेतलेल्या मेहनतीविषयी सांगायचे तर, प्रत्येक कलाकाराला कोणतीही भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेशी समरस होण्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते. त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करावाच लागतो. तसाच या व्यक्तिरेखेच्या देहबोलीचा, वागण्यातील करारीपणाचा अभ्यास मी नक्कीच केला."

दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, "यापूर्वी मी आदिनाथचे काम पाहिले आहे. त्यामुळे दौलतच्या व्यक्तिरेखेत तो चपखल बसला. त्याने त्याच्या भूमिकेला शंभर टक्के न्याय दिला आहे. टिझरमध्येच आपल्याला दौलतच्या व्यक्तिरेखेचा अंदाज आला आहे. त्यामुळे पडद्यावर दौलत काय करणार आहे, हे प्रेक्षकांना कळेलच. आता 'चंद्रमुखी' समोर यायची आहे. तीही लवकरच आपल्या भेटीला येईल."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT