Flight Harassment Viral Video: विमानात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेत आली आहे. अभिनेत्री उर्वी कोठारी हिने फ्लाइटमध्ये तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला असून, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
उर्वी कोठारीने सांगितले की, तिच्या मागे बसलेल्या प्रवाशाने वारंवार तिच्या सीटला हात लावणे, सीट पकडणे आणि तिच्या आर्मरेस्टपर्यंत हात व पाय आणणे अशा प्रकारचे अयोग्य वर्तन केले. तिने अनेकदा त्या व्यक्तीला थांबण्यास सांगितले, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या उर्वीने तात्काळ केबिन क्रूला माहिती दिली. क्रू मेंबर्सनी त्या प्रवाशाशी चर्चा देखील केली, मात्र त्यानंतरही त्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे उर्वीची भीती आणि अस्वस्थता अधिक वाढली.
स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर आणि त्या व्यक्तीने पाय आर्मरेस्टवर ठेवण्याचा प्रयत्न केल्यानंतर उर्वीला अखेर आपली सीट बदलावी लागली. तिने सांगितले की, ती बराच वेळ अर्ध्या सीटवर बसून प्रवास करत होती, हा तिच्यासाठी अत्यंत त्रासदायक अनुभव होता.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी उर्वीला पाठिंबा देत अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली. मात्र काही यूजर्सनी तिच्यावरच टीका करत, तिने लगेच विरोध का केला नाही, असा सवाल उपस्थित केला. काहींनी हा प्रकार ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचाही आरोप केला.
या घटनेमुळे विमानातील प्रवाशांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सार्वजनिक प्रवासात अशा घटनांवर तातडीने आणि कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.