अभिनेता सचिन चांदवडेने टोकाचा निर्णय घेत जीवन संपवले आहे. सचिन केवळ 25 वर्षांचा होता. सचिनने आत्महत्या का केली याचे कारण अजून समोर आलेले नाही. या घटनेने सचिनच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. सचिनचा असुरवन हा सिनेमा काही दिवसातच रिलीज होणार आहे. पण त्यापूर्वीच सचिनने जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिनने जळगावमधील राहत्या घरी गळफास घेतला. घरच्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण 24 तारखेला रात्री 1.30 वाजता सचिनचे निधन झाले.
मूळचा जळगावचा असलेला सचिन आय टीमधील करियरसोबतच अभिनयाची आवडही जोपासत होता. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला सचिन अभिनय क्षेत्रात सक्रिय होता. नेटफ्लिक्सच्या जमतारा 2 या सिरिजमध्ये सचिनने काम केले होते. कलावंत ढोल ताशा पथकातही सचिन सक्रिय होता. एक उदयोन्मुख कलाकार म्हणून सचिनचे नाव घेतले जात होते. याशिवाय सचिनने विषय क्लोज या सिनेमातही काम केले होते. नोकरीचा व्याप सांभाळत सचिन अभिनयांची आवड जोपासयचा. सोशल मिडियावरही सचीन सक्रिय असायचा. काहीच दिवसांपूर्वी सचिनने असूरवन या सिनेमाचे मोशन पोस्टर शेयर केले होते. असुरवन च्या निर्मात्यांनीही अजून सचिनच्या निधनाच्या बातमीबाबत कोणतीही अपडेट शेयर केली नाही.