ACP Ayushman Parth Samthaan to CID
मुंबई - सीआयडी मालिका पुन्हा सुरु झाली आणि एसीपी प्रद्युम्न (शिवाजी साटम) यांची जागा ३४ वर्षीय अभिनेता पार्थ समथानने घेतली. हे वृत्त समोर येताच त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण, सीआयडी मालिका इतकी गाजली होती की, एसीपी प्रद्युम्नच्या जागी अन्य अभिनेत्याला पाहणे, प्रेक्षकांच्या पसंतीस पडले नाही आणि पार्थला ट्रोल केलं गेलं. पण आता मोठे वृत्त समोर आले आहे. सीआयडी २ या कल्ट टीव्ही मालिकेत एसीपी आयुष्मान म्हणून अभिनेता पार्थ समथानचा प्रवास संपला आहे, असे त्याने सोमवारी जाहीर केले आहे.
CID २ मध्ये पार्थ समथानने एसीपी म्हणून एन्ट्री केली होती. पण तो काही काळासाठीच या शोमध्ये आला होता. आता त्याने मालिकेला निरोप दिलाय. सेटपर फेयरवेल पार्टीचा व्हिडिओ त्याने पोस्ट केलाय. पार्टीत केक कापून शिवाजी साटम, दयानंद शेट्टी यांच्यासोबत फोटो क्लिक केले.
पार्थ समथानने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आणि एसीपी आयुष्मान ...बास इतकच, लोकांकडून ट्रोल होण्यापासून ते एसीपी पर्यंत प्रेम मिळणं, शिकणे, हास्य, गोड आठवणींचा सुंदर प्रवास होता...संपूर्ण सीआयडी टीम (कास्ट आणि क्रू) सोबत शेअर करण्यात आलेल्या या नात्याला नेहमी सांभाळून ठेवेन... एकमेकांसाठी इतकं प्रेम आणि सन्मान, कुठलीही चिंता नाही की, हे सर्व दीर्घकाळ पर्यंत चालणारा आणि सर्वात आयकॉनिक शो ठरला आहे. सर्व क्रिएटिव्हना खूप-खूप धन्यवाद...'
अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. प्रेक्षकांनी पार्थच्या जागी तरुण एसीपी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण अखेर चाहत्यांनी त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. कैसी ये यारियां या मालिकेतील भूमिकेसाठी प्रसिद्ध झालेला पार्थ पाच वर्षांनी सीआयडीमधून टेलिव्हिजनवर परतला. त्याची शेवटची दैनिक मालिका 'कसौटी जिंदगी की' होती.
शिवाजी साटम यांच्या व्यतिरिक्त मालिकेत आदित्य श्रीवास्तव, दयानंद शेट्टी, दिनेश फडणीस, श्रद्धा मुसळे आणि नरेंद्र गुप्ता हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत.
मूळ सीआयडीमध्ये डॉ. तारिकाची भूमिका साकारणारी श्रद्धा मुसळे सीआयडी सीझन २ मध्ये पुनरागमन करत आहे! या आयकॉनिक क्राइम ड्रामाच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. कारण तिच्या शूटिंगमधील पडद्यामागील फोटो सोशल मीडियावर आधीच समोर आला आहे.