पुढारी ऑनलाईन डेस्क - लोकप्रिय कार्यक्रम आता होऊ दे धिंगाणाचं तिसरं पर्व १६ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. एनर्जेटिक सुपरस्टार, होस्ट सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज आहे. तिसऱ्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे यंदा धिंगाणा रंगणार आहे. गावामध्ये अर्थात मुक्काम पोस्ट धिंगाणा बुद्रुक मध्ये. धिंगाणाच्या मंचावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कलाकार मंडळी येतात. त्यामुळे तिसऱ्या पर्वात धमाल-मस्तीसोबतच महाराष्ट्राच्या मातीतली विविधता नवनव्या टास्कच्या माध्यमातून धिंगाणाच्या मंचावर अनुभवता येणार आहे. (Aata Hou De Dhingana)
मागच्या पर्वात सुपरहिट ठरलेल्या साडे माडे शिंतोडे, बोबडी वळाली, धुऊन टाक, रेखाटा पटा पटा या फेऱ्या या पर्वातही असणार आहेत. याच्या सोबतीला गरागरा आणि भराभरा, डब्बा डब्बा उई उई, स्मायली काय गायली अशा अतरंगी फेऱ्या देखील असणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन पर्वात ज्या फेरीची सर्वाधिक चर्चा रंगली त्या साडे माडे शिंतोडेचं नवं रुप या पर्वात पाहायला मिळेल. (Aata Hou De Dhingana)
दोन मालिकांच्या टीममधली सांगितिक लढत प्रेक्षकांसाठी पर्वणी असेलच पण त्यासोबतच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गंमती-जमतीही या मंचावर उलगडतील. अभिनेता सिद्धार्थ जाधव या नव्या पर्वासाठी अतिशय उत्सुक असून प्रेक्षकांप्रमाणेच मी सुद्धा या पर्वाची वाट पहात होतो अशी भावना सिद्धार्थने व्यक्त केली.
यंदाच्या पर्वात म्युझिक आहे, मस्ती आहे आणि सोबतीला गावरान ठसकाही आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पहावा असा आता होऊ दे धिंगाणा ३ असणार आहे. होऊ दे धिंगाणाचं तिसरं पर्व १६ नोव्हेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता पाहता येईल.