Aamir Khan touches Rajinikanth feet
चेन्नई : 'कुली' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात एक असा क्षण आला, जेव्हा सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या. बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
'कुली' या चित्रपटात आमिर खान एका विशेष भूमिकेत दिसणार आहे, तर रजनीकांत या गँगस्टर ड्रामामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'विक्रम' आणि 'लिओ' फेम लोकेश कनागराज यांनी केले आहे. विशेष म्हणजे, लोकेशसोबत आमिर आणखी एक मोठा चित्रपट करणार आहे. ट्रेलर लाँचवेळी आमिरचा रजनीकांत यांच्याप्रती असलेला आदर स्पष्टपणे दिसून येत होता आणि त्याच्या याच कृतीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
'झूम'ला दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खानने एक रंजक खुलासा केला. तो म्हणाला, "जेव्हा लोकेश कनागराज यांनी मला 'कुली'मध्ये कॅमिओ करण्याची ऑफर दिली, तेव्हा मी स्क्रिप्टचा एक शब्दही न ऐकता त्वरित होकार दिला. कारण हा रजनी सरांचा चित्रपट आहे आणि त्यांच्या चित्रपटात कोणतीही भूमिका करायला मी तयार आहे." आमिरच्या या बोलण्यातून रजनीकांत यांच्याबद्दलचा त्याचा आदरभाव दिसून येतो.
आमिरने हेदेखील निश्चित केले आहे की, तो लोकेश कनागराजसोबत एक चित्रपट करणार आहे. या चित्रपटाचे काम लोकेशच्या 'कैथी २' नंतर सुरू होईल. हा प्रोजेक्ट पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. यावरून आमिर खान दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शकांसोबत आपले नाते अधिक घट्ट करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
'कुली' हा एक मल्टीस्टारर चित्रपट असणार आहे. यामध्ये रजनीकांत आणि आमिर खान यांच्याशिवाय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे कलाकार दिसणार आहेत.
प्रमुख कलाकार : नागार्जुन, सत्यराज, उपेंद्र, श्रुती हासन आणि सौबिन शाहिर.
प्रदर्शनाची तारीख : हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी तमिळ, हिंदी, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.