Aamir Khan Bishnoi Gang Threat: बॉलिवूड अभिनेता आमिर खानला बिश्नोई गँगकडून कथित धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट आणि ऑडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सलमान खाननंतर आता आमिर खानही बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई या नावांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आमिर खानला उद्देशून धमकीची पोस्ट आणि एक ऑडिओ शेअर करण्यात आला आहे. मात्र, या पोस्ट आणि ऑडिओची अधिकृतपणे कोणतीही पडताळणी झालेली नाही.
व्हायरल पोस्टमध्ये, "आमिर खानसारखे लोक देशात लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहेत. आमच्या संस्कृतीविरोधात जाणाऱ्या अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही. याला लवकरच आमच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल," असा दावा करण्यात आला आहे.
तसेच, "आमच्या धर्म, संस्कृती आणि देशाविरोधात जाणाऱ्या कोणालाही आम्ही सोडणार नाही. स्टारडमच्या जोरावर अशा गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्यांना सोडणार नाही," अशा स्वरूपाची धमकीही पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
दरम्यान, या कथित धमकीनंतर आमिर खान किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच, संबंधित सोशल मीडिया पोस्ट आणि ऑडिओची सत्यता तपासली जात असून, अधिकृत यंत्रणांकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन समोर आलेले नाही.
या प्रकरणामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिस किंवा तपास यंत्रणांकडून या प्रकरणाची अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.