पुढारी ऑनलाईन डेस्क : 'पुष्पा: द रुल - भाग २' (Pushpa 2 The Rule) फेम अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या ज्युबली हिल्स येथील घरात घुसून मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना अटक केली होती. त्यांना आज सोमवरी हैदराबादच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. या घटनेदरम्यान एका बीआरएस नेत्याने एक दावा केला आहे की या संशयितांपैकी एकजण रेड्डी श्रीनिवास हा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा निकटवर्तीय आहे. पण रेवंत रेड्डी अथवा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने बीआरएसच्या या आरोपावर अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही.
उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (OUJAC) सदस्यांनी अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील ज्युबली हिल्समधील घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ४ डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत रोजी मृत्यू झालेल्या ३५ वर्षीय महिलेच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली होती. 'पुष्पा 2: द रुल'च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुन संध्या थिएटरमध्ये आला होता; त्यावेळी चेंगराचेंगरी झाली होती.
अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घरावर उस्मानिया विद्यापीठातील संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) सदस्यांनी दगडफेक केली. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले होते. या घटनेवेळी अल्लू अर्जुन त्याच्या घरी नव्हता. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी ६ संशयितांना न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यांना दोन जामीनदारांसह प्रत्येकी १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
या प्रकरणातील संशयित श्रीनिवास हा रेवंत रेड्डी यांचा निकटवर्तीय असून तो २०१९ च्या जिल्हा परिषद प्रादेशिक मतदारसंघ (ZTPC) निवडणुकीत कोडंगलमधील काँग्रेसचा उमेदवार होता, असा दावा बीआरएस नेते कृष्णांक यांनी केला आहे. अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणारा रेड्डी श्रीनिवास हा उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थी नेता नाही. तो रेवंत रेड्डी यांचा जवळचा सहकारी आहे, असा दावा कृशांक यांनी X वरील पोस्टमधून केला आहे. त्यांनी या पोस्टसोबत संशयिताचे फोटो पोस्ट केले असून त्यात तो मुख्यमंत्र्यांसोबत दिसतो.