Aamir Khan First Short Film Financier Shriram Lagoo
मुंबई : आमिर खानची ओळख मी. परफेक्टनिस्ट म्हणून असली तरी यापाठीमागे खूप प्रयत्न आहेत. अगदी शाळेत असल्यापासून आमिर खानला फिल्मविषयी आकर्षण होत. आई वडील दोघेही चित्रपटक्षेत्राातील असूनही आमिर खानला मात्र या क्षेत्रात येण्यापासून रोखले होत. पण आमिर खानने पालकांना न कळता या क्षेत्रात हळू हळू प्रवेश केला. आमिर ॲक्टर बनण्यासाठी कारणीभूत ठरले ते म्हणजे मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील बहूहून्नरी अभिनेते डॉ. श्रीराम लागू. कारण डॉ. लागू यांनी आमीरला त्याच्या पहिल्या शॉर्ट फिल्मसाठी मदत केली होती.
एका टिव्ही शोमध्ये आमिर खान याने नुकताच सहभाग नोंदवला यावेळी त्यांने आपला ॲक्टर होण्याचा प्रवास उलघडून दाखवला. यावेळी त्याने शालेय जीवनापासून शालाबाह्य गोष्टींचे कसे आकर्षण असायचे, पुस्तके वाचायचा छंद कसा लागला याविषयी किस्से सांगितले. यामध्ये त्याने दहावी संपल्यानंतर सुट्टीमध्ये कशी शॉर्ट फिल्म तयार केली हे सांगितले
जुगाड करुन बनवली पहिली शॉर्ट फिल्म
आमिर खान दहावीत शिकत असताना दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचा मुलगा आदित्य चॅटर्जी त्यांच क्लासमेट होता.दोघेही बॅक बेंचर होते आणि कौटुंबिक पार्श्वभूमी ही सिनेसृष्टीशी संबंधित होती. पण आमिरला सिनेसृष्टीपासून लांब रहा, असे कुटुंबियांनी बजावले होते.
नेमके त्याच दरम्यान आदित्य चॅटर्जी याने शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी आमिरला गळ घातली व त्यामध्ये मुख्य भूमिका करण्यास सांगितले. बासू चॅटर्जी यांच्याकडे फिल्म कॅमेरा होता. तर मनमोहन शेट्टी यांनी कॅमेऱ्यासाठी लागणारी फिल्म पण दिली. पण फिल्म तयार करायची तर खरा प्रश्न आला पैशांचा. मग दोघेही आदित्यच्या इमारतीत सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या डॉ. श्रीराम लागू यांच्या घरी गेले.
.....आणि डॉ. श्रीराम लागू यांनी दिले १० हजार
डॉ. लागू यांच्याकडे गेल्यावर त्यांनी आम्ही शॉर्ट फिल्म करतोय आणि आम्हाला पैशाची गरज आहे असे सांगितले. डॉ. लागू यांनी कोणती फिल्म करताय, किती पैसे लागतील अशी विचारणा केली. आदित्यने थेट दहा हजारांची मागणी केली. यावेळी लागू यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. ते आत गेले व कपाटातून थेट १० हजार आमिरसमोर ठेवले. आणि याच पैशातून त्यांनी पहिली शॉर्ट फिल्म तयार केली. १९८१ मध्ये ही रक्कम खूप मोठी होती. यात आमिर खानने मुख्य भुमिका केली होती.
‘पॅरानॉया’ असे या शॉर्ट फिल्मचे नाव होते व ती ४० मिनिटांची सायलेंट फिल्म होती. यामध्ये म्युझिक, संवाद काहीच नव्हते. या चित्रपटात व्हिक्टर बॅनर्जी यांनी वडिलांची, निना गुप्ता यांनी मैत्रिणीची, तर आलोक नाथ यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती.
स्पॉट बॉय पासून प्रॉडक्शन मॅनेजर आमिरच
ही एका पौंगडावस्थेत आलेल्या मुलाची कथा होती, यामध्ये हिंसा, सेक्स, रोमान्स कडे पाहण्याचा दृष्टीकोन याचे चित्रण आहे. ही एक स्टूडंट फिल्म होती. यामध्ये फिल्ममध्ये आमिरने मुख्य भूमिका केली होती, तसेच स्पॉट बॉय, प्रोडक्शन मॅनेजरचेही काम केले होते होते. तर आदित्यने चॅटर्जीने दिग्दर्शन केले होते.
आयुष्य बदलवणार अनुभव
हा अनुभव या विद्यार्थ्यासाठी आयुष्य बदलणारा ठरला. ‘या शॉर्ट फिल्म निर्मितीची प्रक्रिया इतकी रोमांचक होती की मला समजले, मला आयुष्यात केवळ चित्रपट क्षेत्रातच काम करायचे आहे. हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे, असे आमिर म्हणाला. विशेष म्हणजे, त्याचे वडील ताहिर खान यांचा या गोष्टीला विरोध होता. त्यांच्या मते, चित्रपटसृष्टी ही अस्थिर आहे, आणि त्यांनी त्याला डॉक्टर किंवा चांगल्या नोकरीसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. ही शॉर्ट फिल्म पाहून शबाना आझमी यांनी आमिर खानचे कौतुक केले होते.