Solapur News 
Latest

Solapur News : एमआयडीसी पोलिसांची चोरट्यांच्या कारवर फायरींग

सोनाली जाधव

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अविनाश नगर येथील कोंड्याल शाळेजवळ  पोलिसांनी सराफी दुकान फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांवर फायरींग केली. यामध्ये चोरट्यांच्या कारचे टायर फुटले. फायरींग झाल्यानंतर अंधाराचा फायदा घेत चोरटे त्यांच्याकडील पिस्टल, घरफोडीचे साहित्य, कार सोडून पसार झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली.  याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Solapur News)

माहितीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी निलम नगर येथील बालाजी ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडून चोरट्यांनी चोरी केली होती. हा गुन्हा करणार्‍या चोरट्यांनी सोलापुरातील एक कार चोरून चोरी केली आहे,  चोरलेली कार अविनाश नगरजवळील कोंड्याल शाळेजवळील निर्मनुष्य ठिकाणी लावली आहे, आणि त्या कारमधून आणखी सराफी दुकान फोडण्यासाठी शुक्रवारी रात्री चोरटे येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना होती. त्यावरुन एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी (दि.१३) रात्री कोंड्याल शाळेजवळ अर्धवट असलेल्या बांधकामाजवळ तिन्ही बाजूंनी सापळा लावला होता.

Solapur News : अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार

शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बांधकामाजवळ उभ्या केलेल्या कारच्या दिशेने एका मोटारसायकलवरून तिघेजण आले. कारजवळ मोटारसायकल लावून थांबले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एमआयडीसी पोलिसांनी मोटारसायकलवरील लोकांना थांबण्याचा इशारा केला. परंतु, दुचाकीवरील दोघांनी मोटारसायकल वेगात पुढे नेली व पोलिस शिपाई अर्जुन यांना कट मारून ते दुचाकीवरून विनायक नगरच्या दिशेने पळून गेले. तर तिसरा संशयित हा कारमध्ये बसून कार चालू करून जाऊ लागला, त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांनी त्यास ओरडून थांबण्याचा इशारा केला. परंतु, तो थांबला नसल्याने पोलिस उपनिरीक्षक रजपूत यांनी त्यांच्या शासकीय पिस्तुलातून कारच्या दिशेने दोन राऊंड फायर केले. पोलिसांनी फायरींग केलेली एक गोळी कारच्या मागच्या चाकामध्ये लागल्यामुळे कार ही काटेरी झुडूपात गेली व संशयित चोरटा हा अंधाराचा फायदा घेत पळून गेला.

याबाबत एमआयडीसी पोलिसांनी वरिष्ठांना कळवून कारची तपासणी केली असता कारमध्ये एक गावठी पिस्टल, स्क्रू ड्रांयव्हर, कटावणी, पक्कड असे साहित्य मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी कारसह 3 लाख 500 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला असून याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्‍त डॉ. राजेंद्र माने, उपायुक्‍त विजय कबाडे, सहायक आयुक्‍त संतोष गायकवाड, पोलिस निरीक्षक राजन माने, शिवशंकर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विक्रम रजपूत, हवालदार राकेश पाटील, नाना उबाळे, दिपक डोके, सचिन भांगे, पोलिस नाईक मंगेश गायकवाड, सुहास अर्जुन, शंकर याळगी, काशिनाथ वाघे, दिपक नारायणकर, शैलेश स्वामी, अमोल यादव, आमसिध्द निंबाळ, देविदास कदम, भारतसिंग तुक्कुवाले यांनी केली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT