पुढारी ऑनलाईन डेस्क : "कोल्हापूरमध्ये अशा दंगली होणं चांगलं नाही. संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि आता कोल्हापुरमध्येही अशा घटना घडत आहेत. या घटनांच्या मुळात जाऊन तपास करायला पाहिजे. अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि समाजात सलोखा रहावा यासाठी या घटने मागील कारणं शोधली पाहिजेत. दोन्ही समाजातील सलोख्यासाठी मी पुढाकार घेईन, असे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी म्हटले आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले की, सामाजिक सलोखा हा कोल्हापूरचा गाभा आहे. ७५ वर्षे आपल्या लोकशाहीला झाले आहेत. आता नवीन युगात राहतोय आशा वेळेस आपल्या पूर्वजांचा विचार आणि त्यांच्या शिकवणी आपल्या डोळ्यासमोर असणे गरजेचे आहे. असे यापूर्वी कधी झालं नव्हतं. याच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे, काय कारण आहे हे शोधलं पाहिजे.
सर्वांनी सलोख्याने राहिले पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्वात पहिला सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी शासनाची आणि गृहखात्याची असते. त्यांनी या संबंधित सर्व रिपोर्ट घेतले पाहिजे आणि अशा घटना परत होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. संभाजीनगर, नाशिक, आता कोल्हापूर याचा अभ्यास करून याची लिंक आहे की सर्व वेगवेगळ्या आहेत, याकडे पाहिले पाहिजे. पोलिसांनी यापुढे सतर्क राहिले पाहिजे आणि त्यांची जी तपास यंत्रणा असते ती जास्त अॅक्टिव्ह व्हायला हवी,असेही ते म्हणाले.
मी काल जिल्हाधिकारी, एसपी आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांना बोललो होतो की, काही गरज वाटली तर मी स्वतः रस्त्यावर येऊन लोकांना शांत राहा सांगायला तयार आहे. मात्र त्यांना कदाचित आवश्यकता वाटली नसावी. त्यामुळे त्यांनी मला नसेल काही कल्पना दिली. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर झाले पाहिजे आणि संबंधितांना कायदेशीर शिक्षा व्हायला हवी. लोकांना आपला इतिहास माहिती असायला हवा आणि आपल्याला काय स्टेटसला लावायचे याबाबत काळजी घ्यायला हवी. माझ्यासह सर्वजण या व्हिडिओ नंतर अस्वस्थ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कोल्हापुरमध्ये घडलेली घटना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश म्हणावे लागेल का? माध्यमांनी विचारलेल्या या प्रश्नावर बोलताना शाहू छत्रपती म्हणाले की, एकाच व्यक्तीला या प्रकरणावर जबाबदार धरणे चुकीचे आहे. सत्ताधारी आणि विरोधी दोघांनी मर्यादा ठेवाव्यात. आशा दंगलीमुळे लोकांचे हाल होत असतात, याचं भान असले पाहिजे. प्रत्येकाने शांतता कायम राहील यासाठी प्रत्येकाने तसे वागले पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर चालण्याची गरज आहे. लोकशाहीमध्ये सुराज्य आणायचे असेल तर सर्वांनी एकोप्याने राहिले पाहिजे, असेही शाहू छत्रपती महाराज यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :