Latest

Shreyas Iyer Injury : श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, कारण…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shreyas Iyer Injury : श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. पाठीची दुखापतीमुळे श्रेयस किवींविरुद्धच्या मालिकेत खेळणार नसून त्याच्या जागी मध्य प्रदेशचा फलंदाज रजत पाटीदारची निवड करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने मंगळवारी दुपारी दिली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बुधवारी (18 जानेवारी) हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. त्याआधीच टीम इंडियाला श्रेयस अय्यरच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. वनडे संघात तो मधल्याफळीतील भरवशाचा फलंदाज आहे. 2022 मध्ये श्रेयस भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.

श्रेयसची दुखापत किती खोलवर आहे, त्यातून सावरायला किती वेळ लागेल, हे अद्याप कळलेले नाही. आता तो त्याच्या रिहॅबिलिटेशनसाठी बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) जाणार आहे. सध्या जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे देखील दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. तर कार अपघातात जखमी झालेला ऋषभ पंत वर्षभर मैदानाबाहेर राहणार आहे. याआधी रोहित शर्मा, दीपक चहर, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी हेदेखील खराब फिटनेसमुळे आत-बाहेर झाले आहेत. (Shreyas Iyer Injury)

राहुल आणि अक्षर वैयक्तिक कारणांमुळे खेळणार नाहीत

केएल राहुल आणि अक्षर पटेल वैयक्तिक कारणांमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत खेळणार नाहीत. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या विवाहसोहळ्यानिमित्त सुट्टी घेतली आहे. या दोघांच्या अनुपस्थितीमुळे यष्टीरक्षक केएस भरत आणि अष्टपैलू शाहबाज अहमद यांची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमध्ये न खेळलेल्या शार्दुल ठाकूरची अर्शदीप सिंगच्या जागी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर रजत पाटीदारला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. यापूर्वीही त्याची संघात निवड झाली आहे. रजतला न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाची संधी मिळू शकते.

वन-डेनंतर टी-20 मालिका..

मालिकेतील दुसरा वन-डे सामना 21 जानेवारीला रायपूरमध्ये तर तिसरा आणि शेवटचा सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकाही खेळवली जाणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी भारताचा एकदिवसीय संघ (Shreyas Iyer Injury)

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT