sanjay raut  
Latest

Sanjay Raut Press Conference : सरकार पाडण्यासाठी भाजपनं मदत मागितली होती, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन

Sanjay Raut Press Conference : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मंगळवारी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. भाजपचं लोक मला तीनवेळा भेटले. त्यांनी वारंवार मला सांगितले की तुम्ही मध्ये पडू नका. आमचं सरकार येण्यासाठी मदत करा. जर तुम्ही लोकांनी मदत केली नाही. तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, अशा धमक्या देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. हे सरकार पडणार नाही हे जेव्हा त्यांना मी सांगितले तेव्हा माझ्या नातेवाईकांवर ईडीच्या धाडी पडल्या. तिहार जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या, असा दावा त्यांनी केला.

महाराष्ट्रातील सरकार त्यांना पाडायचे आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. एकतरी तुम्ही गुडघे टेका नाहीतर सरकार घालवू, अशी धमक्या दिल्या जात आहेत. पण आम्ही झुकणार नाही. महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही, मराठी माणूस बेईमानी नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपला खडे बोल सुनावले.

आजच्या पत्रकार परिषदेपूर्वी महाविकास आघाडीमधील शरद पवार आणि अन्य नेत्यांचा मला फोन आला. त्यांनी मला पुढे व्हा असे सांगत आशीर्वाद दिले आहेत. ही सुरुवात शिवसेना भवनातून झाली असून शेवट ईडीच्या कार्यालयासमोर होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मी जिथे कपडे शिवले तेथेही ईडीने तपास केला असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप त्यांनी केला. पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरणी बोलताना राऊत यांनी, राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात २० कोटी गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

किरीट सोमय्यांचा मुलगा राकेश वाधवानचा पार्टनर असल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. निकॉन इन्फास्ट्रक्चर कंपनी किरीट सोमय्यांची मुलाची असल्याची माहिती राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना तातडीने अटक करा, अशी मागणी त्यांनी केली. किरीट सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराच्या कागदपत्रे तीन वेळा मी ईडी कार्यालयात पाठविली आहेत. किरीट सोमय्या ईडी कार्यालयात खिचडी खात बसलेला असतो. किरीट सोमय्या ईडीचा दलाल आहेत. भाजपचे लोक ईडीचे वसुली एजंट बनलेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

मला जेलमध्ये टाका. पण माझ्या कुटुंबियांना, नातेवाईकांची सतावणूक कशासाठी? असा सवाल त्यांनी केला. हा ट्रेलर आहे यापुढे मी व्हिडिओ, क्लिप्स घेऊन येणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन जण कोठडीत जातील, असा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेपूर्वी दिला होता. पण त्यांनी पत्रकार परिषदेत साडेतीन नेते कोण याचा काही स्पष्ट उल्लेख केलेला दिसून आला नाही.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात किंगमेकर ठरलेले शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून बॅकफूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. भाजपला सळो की पळो करून सोडलेले संजय राऊत ईडीच्या कारवायांनी गेल्या काही दिवसांपासून केंद्रस्थानी आहेत. त्याचबरोबर आघाडी सरकारमधील अनेकांनी ईडी सीबीआयचा ससेमीरा लागल्याने तसेच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याने महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा, भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, मंत्री उदय सामंत, अनिल परब, दिवाकर रावते, सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आदेश बांदेकर आदी शिवसेना नेते पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT