डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर नवे संकट उभे राहिले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर ठाकरे गटाने तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी संघर्ष सुरू असताना दुसरीकडे ठाकरे सेनेचे मशाल चिन्हही धोक्यात आले आहे. या चिन्हावर पुन्हा एकदा समता पक्षाने दावा करत आक्रमक भूमिका घेतली आहे. (Shivsena Crises)
समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मंडल म्हणाले, उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते. मात्र त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या मेहरबानीमुळे त्यांना हे चिन्ह पुढे देखील मिळाले. मात्र मशाल हे चिन्ह समता पार्टीचे आहे मशाल समता पार्टीची ओळख असल्याचे मंडल यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना दिलेले मशाल चिन्ह परत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी दिली. मशाल चिन्हासाठी आम्ही निवडणूक आयोगात दादही मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी आम्ही आवश्यक त्या कागपत्रांची पूर्तता केल्याचेही उदय मंडल म्हणाले. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचं मंडल यांनी सांगितले. जर यावेळी आम्हाला निवडणूक आयोगाने दाद दिली नाही, तर मात्र आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशाराही मंडल यांनी दिला.
उद्धव ठाकरे सद्या भाड्याची मशाल वापरत असल्याचा टोलाही मंडल यांनी यावेळी बोलताना लगावला. समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे हे मशाल हे चिन्ह आम्हालाच मिळेल. लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंचे मशाल चिन्ह त्यांच्याकडून जाणार आहे आणि ते समता पार्टीकडे येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा