Latest

Share Market Today | गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी बुडाले, सेन्सेक्स कोसळण्यामागे ‘हे’ ४ प्रमुख घटक कारणीभूत

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Share Market Today आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि.१०) सकाळच्या सत्रात शेअर बाजाराचा (Stock Market Updates) सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला होता. त्यानंतर बाजार बंद होताना ही घसरण कमी झाली. सेन्सेक्स २०० अंकांनी खाली येऊन ५७, ९९१ वर बंद झाला. तर निफ्टी ७३ अंकांनी घसरून १७,२४१ वर बंद झाला. पण सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ८०० अंकांनी (Sensex crash) घसरल्याने काही क्षणात गुंतवणूकदारांना ३ लाख कोटींचा फटका बसला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या दरवाढीनंतर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. कमकुवत जागतिक संकेतामुळे शेअर बाजारात विक्रीचा ओघ पहायला मिळत आहे. आज बाजारात झालेल्या घसरणीमुळे BSE वर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ३.११ लाख कोटींनी घसरून २७२.५ लाख कोटी रुपयांवर आले.

फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीची चिंता

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीची चिंता गुंतवणुकदारांना वाटत आहे. अमेरिकेच्या बेरोजगारीचा दर ३.५ टक्के असून हा कमी झालेला बेरोजगारीचा दर असे दर्शवितो की फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढविणे सुरूच ठेवेल. याचे पडसाद शेअर बाजारात दिसून येत आहेत.

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्रीचा धडाका

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात ७,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भारतीय समभागांची विक्री केली आहे. आता रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी २,२५१ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. (Share Market Today)

कच्च्या तेलाचे दर

सौदीच्या नेतृत्वाखालील तेल उत्पादक देशांनी तेल उत्पादन कमी करण्यास सहमती दिल्यानंतर बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्यूचर्समध्ये गेल्या आठवड्यात ११ टक्क्यांपेक्षा जास्त तेजी आली आहे. यामुळे कच्च्या तेलाचा दर पुन्हा एकदा प्रति बॅरेल १०० डॉलर जवळ पोहोचला आहे.

रुपयाची नीचांकी घसरण

सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ३८ पैशांनी घसरून ८२.६२ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. २०२२ या वर्षात रुपयाचे मुल्य ११ टक्क्यांनी खाली आले आहे. रुपयाची घसरण सुरुच असून आज डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी ८२.६४ वर खुला झाला होता. तेलाच्या किमती, वाढते ट्रेझरी उत्पन्न, कॉर्पोरेट आउटफ्लो आणि अमेरिकी चलनाची मागणी या पार्श्वभूमीवर अलीकडील काही सत्रांमध्ये रुपयाची नीचांकी घसरण झाली आहे. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियालादेखील रुपयाची घसरण रोखण्यात यश आलेले नाही.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT