Share Market Closing : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आज सोमवारी (दि. २७) सावध सुरुवात केली होती. पण आर्थिक संकटात सापडलेली सिलिकॉन व्हॅली बँक फर्स्ट सिटिझन्स बँकने खरेदी केल्याच्या वृत्ताने गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या. जागतिक बँकिंग क्षेत्र आर्थिक संकटातून बाहेर पडत असल्याच्या आशेने आज सोमवारी (दि.२७) बाजारात तेजी परतली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५७,६०० वर तर निफ्टी १७ हजारांच्या खाली होता. त्यानंतर काही वेळातच दोन्ही निर्देशांकांनी तेजीच्या दिशेने वाटचाल केली. दुपारी साडेबारा वाजता सेन्सेक्स जवळपास ४०० अंकांनी वाढला होता. त्यानंतर सेन्सेक्स १२६ अंकांच्या वाढीसह ५७,६५३ वर बंद झाला. तर निफ्टी ४० अंकांनी वाढून १६,९८५ वर स्थिरावला.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक शेअर्सची खरेदी तसेच अमेरिकन बाजारातील सकारात्मक भावनांमुळे भारतीय शेअर बाजारात दिवसभर तेजीचे वातावरण राहिले. आजच्या व्यवहारात हेवीवेट फायनान्सियल निर्देशांक ०.३ टक्के वाढला. १३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी ८ मध्ये वाढ दिसून आली. क्षेत्रीय निर्देशांकांत मेटल आणि फार्मा हे टॉप गेनर्स होते.
आजच्या व्यवहारात सेन्सेक्सवर रिलायन्स (१.६५ टक्के वाढ), एचडीएफसी बँक (०.३९ टक्के वाढ), इन्फोसिस (०.९७ टक्के वाढ), टीसीएस (०.६३ टक्के वाढ) हे वाढले होते. तर पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, टेक महिंद्रा हेदेखील वधारले होते. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक हे घसरले होते. अदानी ग्रीन एनर्जी, रिलायन्स, टाटा पॉवर अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्टस हे बीएसईवर सर्वात ॲक्टिव्ह शेअर्स होते. आज सुमारे ९४२ शेअर्स वाढले, २,३९४ शेअर्स घसरले आणि ११८ शेअर्समध्ये कोणताही फरक दिसून आला नाही.
शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ९ महिन्यांत पहिल्यांदाच २४७ लाख कोटींच्या खाली आले आहे. अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग क्षेत्रातील संकटामुळे भारतीय बाजारात विक्रीचा दबाव वाढला आहे. जर्मनीतील दायचे बँकने देखील बँकिंग क्षेत्रातील चिंता आणखी वाढवली आहे. सध्या भारतीय बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २४६.२२ लाख कोटींवर (२.९९ लाख कोटी डॉलर) आहे. याआधी २३ जून २०२२ रोजी बाजार भांडवल याच पातळीवर होते. यावर्षी बाजार भांडवलात सुमारे २४.७० लाख कोटींनी (३० हजार कोटी डॉलर) कमी झाले आहे. भारतीय शेअर बाजार जगभरात सहाव्या स्थानावर आहे. उर्वरित देशांचा विचार केल्यास ४१.८३ लाख कोटी डॉलर बाजार भांडवलासह अमेरिका अव्वल स्थानी आहे. त्यानंतर चीन १०. ६७ लाख कोटी डॉलर, जपान ५.५९ लाख कोटी डॉलर, हाँगकाँग ५.३५ लाख कोटी डॉलर आणि फ्रान्सचे बाजार भांडवल ३.०५ लाख कोटी डॉलर आहे. (Share Market Closing)
आशियाई बाजारातील आज संमिश्र वातावरण होते. हाँगकाँग आणि शांघाय येथील बाजार घसरले. तर टोकियो आणि सिंगापूर येथील निर्देशांक तेजीत होते. तीन दिवसांनंतर जपानचा निक्केई निर्देशांक वाढला आहे. निक्केई ०.३३ टक्के वाढीसह २७,४७६ वर बंद झाला.
हे ही वाचा :