शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील (Shakti Mills Gang Rape Case) तीन आरोपींची फाशीची शिक्षा आज मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली. तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
शक्ती मिल सामूहिक बलात्काराच्या घटनेने समाजाला मोठा धक्का दिला. बलात्कार हा मोठा गुन्हा आहे. सन्मानावर होणारा हा हल्ला पीडितेची शारीरिकसह मानसिक आरोग्याचीही हानी करतो;पण न्यायालय हे नागरिकांच्या मतांवर शिक्षा ठोठावू शकत नाही. नियमाप्रमाणे जन्मठेपीची शिक्षा आहे. फाशी हा एक अपवाद आहे, असे यावेळी न्यायालयाने सांगितले.
ऑगस्ट २०१३ मध्ये मुंबईतील शक्तीमिल परिसरात फोटो जर्नलिस्ट तरुणी आपल्या मित्राबरोबर गेली होती. यावेळी तिच्यावर चौघांनी बलात्कार केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये मोहम्मद कासिम हाफिज शेख उर्फ कासिम बंगाली (वय २१), मोहम्मद सलीम अन्सारी ( 28) आणि विजय मोहन जाधव (१९) या तिघांसह अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. २०१४ मध्ये दोषी आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.
शक्ति मिल कपाऊंड हा मुंबईतील एक निर्जन परिसर आहे. २२ ऑगस्ट २०१३ला एक महिला फोटोग्राफर तिच्या मित्रासह वार्तांकनासाठी या परिसरात गेले होते. त्या वेळी ५ जणांनी या महिलेच्या मित्राला बांधून ठेवले आणि या महिलेवर बलात्कार केला. तसेच या अत्याचाराचे या ५ जणांनी फोटोही घेतले होते. जर पोलिसांत तक्रार दिली तर फोटो सोशल मीडियावर टाकू, अशी धमकी या आरोपींनी पीडितेला दिली होती; पण या महिलेने धाडसाने तक्रार दिली. यातील आरोपींना पोलिसांना तातडीने अटक केली. आरोपींपैकी १ जण अल्पवयीन होता.
या घटनेचा तपास सुरू असताना अन्य एक तरुणीने शक्तीमिल्स परिसरात आपल्यावर बलात्कार झाला होता, अशी तक्रार पोलिसांत दिली. या घटनेतील ३ आरोपी हेच फोटोजर्नलिस्ट महिलेवर बलात्कार करणारे आहेत, हे तपासात निष्पन्न झाले.
४ एप्रिल २०१४ला न्यायायलाने यातील ३ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. रिपिट ऑफेंडर असल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने या तिघांना फाशीची शिक्षा दिली. तर एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दोन्ही केस मधील प्रत्येकी १ असे दोन अल्पवयीन आरोपी होते, त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले. १ एक आरोपी माफीचा साक्षीदार बनला होता.