पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या पणन संचालकपदी सहकार आयुक्तालयातील अपर निबंधक (प्रशासन) शैलेश कोथमिरे यांची नियुक्ती सोमवारी शासनाने केली आहे. त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. सहकार व पणन विभागातील अनुभवी अधिकारी असलेल्या कोथमिरे यांच्याकडे पणन संचालक पदाची धुरा येण्यामुळे पणन संचालनालयाच्या कामकाजाची दिशा आणि गती बदलण्याची अपेक्षा कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आहे.
सहकार विभागात अनेक महत्त्वाच्या पदांवर कोथमिरे यांनी काम केलेले आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर या बँकांना ऊर्जितावस्थेत आणण्याचे कौतुक झाले आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक, साखर आयुक्तालयातील संचालकपदावरही त्यांनी काम पाहिलेले आहे.
पणन संचालकपदावर सहकार विभागाचे सहनिबंधक विनायक कोकरे यांची राज्य कृषी पणन मंडळातील सरव्यवस्थापकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तेथील कार्यकारी संचालकपदाच्या रिक्त जागेचाही अतिरिक्त पदभार तूर्तास कोकरे यांच्याकडेच सोमवारी (दि.26) देण्यात आला. मुख्यमंत्री कार्यालयात पाच सहकार अपर निबंधकांच्या पदोन्नतीची फाईल पडून आहे. त्यानंतर कार्यकारी संचालकपदी नवीन अधिकार्यांची नियुक्ती अपेक्षित आहे.
हेही वाचा