पुणे : अशोक मोराळे : 'सेक्सटॉर्शन'चे प्रकार राजस्थानमधून होत असल्याचे पुढे आले असून, वर्षभरात पुण्यातील 682 आंबटशौकिनांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती वाढत असून, महिन्याकाठी 55 पेक्षा अधिक नागरिक सेक्स्टॉर्शनमध्ये अडकल्याचे पोलिसदफ्तरी असलेल्या नोंदीवरून दिसून येते.
राजस्थानमधील भरतपूर, अल्वर जिल्ह्यांतील गावातून बहुतांश सेक्स्टॉर्शन होत असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तक्रारी वाढू लागल्यानंतर तपास करीत असताना राजस्थानातील काही गावांची नावे अधिक आढळून आली आहेत. येथील ठग सुरुवातीला ओएलएक्सद्वारे फसवणूक करीत होते. त्यांनी आता हा सेक्स्टॉर्शन फंडा सुरू केला आहे.
2020 मध्ये तब्बल 500 पेक्षा अधिक नागरिकांना सायबर ठगांनी सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात ओढून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. बदनामीच्या भीतीपोटी कित्येक जण तक्रार देण्यासाठी समोर येत नाहीत. जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीकडून खंडणी उकळण्यासाठी ठगांकडून दिल्ली सायबर पोलिस बोलत असल्याची बतावणी केली जाते. तेथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होईल म्हणून पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर देखील काही जण धास्तीने पैसे ठगांच्या हवाली करत आहेत.
सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके सांगतात, 'सेक्स्टॉर्शनचा तपास करीत असताना राजस्थानमधील गावांची नावे अधिक आढळून आली. त्यामुळे पोलिसांचे एक पथक तिकडे गेले होते. त्या वेळी जमतारामध्ये जशी बेरोजगार तरुण-तरुणी बँक फ्रॉडच्या गुन्ह्यात फसवणूक करतात तशाच पद्धतीने या काही गावांमधील तरुण-तरुणी सेक्स्टॉर्शनच्या प्रकरणात सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर पैसे येत असल्याने स्थानिक लोकांचे या तरुण-तरुणींना पाठबळ मिळत आहे.'
सोशल मीडियावर भेटलेली एखादी अनोळखी तरुणी व्हिडीओ कॉल करून तुम्हाला विवस्त्र होण्यास भाग पाडत असेल, तर जरा भानावर या..! कारण की, भुरळ घालणारी तरुणी दुसरी-तिसरी कोणी नसून सायबर ठगांच्या सेक्सटॉर्शन टोळीची सदस्य आहे. जी तुम्हाला मैत्रीच्या जाळ्यात खेचून 'न्यूड व्हिडीओ कॉल' करते. त्यानंतर ती मोबाईल स्क्रीनवर विवस्त्र होते. तुम्हाला विवस्त्र होण्यास भाग पाडते. मात्र, त्याचवेळी तुमचा व्हिडीओ तरुणीकडे रेकॉर्ड होत असतो. व्हिडीओ कॉल संपताच काही मिनिटात तुमचा न्यूड व्हिडीओ तुमच्या मोबाईलवर धडकतो. त्यानंतर सायबर ठग हा व्हिडीओ तुमच्या मित्रांसह सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत पैशाची मागणी करतो.
समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीसोबत अतिमोकळे होणे टाळले पाहिजे. समोरच्या व्यक्तीचा परिचय असल्याशिवाय मैत्री करणे धोकादायक ठरू शकते. काही झाले तरी आर्थिक व्यवहार करू नये. कोणासोबत असा प्रसंग घडल्यास त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.
– डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर