पुढारी ऑनलाईन डेस्क
Stock Market Updates : अमेरिकेतील वाढती महागाई आणि युक्रेन- रशिया यांच्यातील तणावाचे परिणाम जगभरातील बाजारात दिसून येत आहेत. भारतीय शेअर बाजारातही सोमवारी त्याचे पडसाद उमटले. युक्रेन तणावामुळे जागतिक स्तरावरुन मिळालेल्या नकारात्मक संकेतामुळे शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex) सोमवारी कोसळला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल १४३२ अंकांनी घसरला. तर निफ्टी (Nifty) १७ हजारांच्या खाली येऊन व्यवहार करत होता. त्यानंतर सेन्सेक्सची पडझड दुपारपर्यंत १४०० वरुन ११००० अंकांपर्यंत खाली आली होती. यामुळे सेन्सेक्स ५७ हजारांच्या खाली येऊन व्यवहार करत होता. सेन्सेक्स कोसळल्यामुळे काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान झाले.
सेन्सेक्स सुमारे १,४०० अंकांनी घसरला आणि मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ४ टक्क्यांनी घसरले. यामुळे बीएसई बाजार भांडवलानुसार गुंतवणूकदारांची संपत्ती ६.२७ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन २५७.६२ लाख कोटी रुपयांवर आली. शुक्रवारी संपत्तीचा आकडा २६३.९० लाख कोटी होता.
युक्रेनच्या संकटाची वाढती तीव्रता आणि कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीतील सात वर्षांतील उच्चांकी वाढ यामुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार कोसळला असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. तसेच अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक व्याज दर वाढवणार असल्याच्या धास्तीने जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. भारतीय बाजारातही यामुळे पडझड दिसून येत आहे.
रशिया युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याने जगातील मोठ्या तेल उत्पादक देशांकडून होणारी निर्यात विस्कळीत होईल या भीतीने तेलाच्या किमती सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. याचा परिणाम शेअर बाजारात दिसून येत आहे.
अमेरिकेत महागाई दराने (US Inflation) ४० वर्षातील उच्चांकी पातळी गाठली आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने (US Labour Department) नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील महागाई दर ७.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. १९८२ नंतर अमेरिकेतील महागाईचा हा उच्चांक आहे. अमेरिकेतील महागाईचा तेथील शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.
अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठल्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटत आहेत. ज्यावेळी एखाद्या देशात महागाई वाढते त्यावेळी त्याचा परिणाम दुसऱ्या देशांवरही होतो. अमेरिकत महागाई वाढल्याने अमेरिकेतून इतर देशांत ज्या वस्तू आयात होतात त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. याचा थेट परिणाम देशांतर्गत महागाईवर पडतो.