Latest

Closing Bell | सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात रेकॉर्डब्रेक तेजी, निफ्टी २०,८०० पार, गुंतवणूकदार ३ लाख कोटींनी मालामाल

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : मजबूत मॅक्रो इकॉनॉमिक डेटा, यूएस फेडरल रिझर्व्हकडून मार्चमध्ये व्याजदरात कपातीची शक्यता आणि राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा झालेला विजय यामुळे आज मंगळवारी (दि.५) दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला. आजच्या ट्रेडिंग क्षेत्रात चौफेर खरेदी दिसून आली. सेन्सेक्स आज ४३१ अंकांनी वाढून ६९,२९६ वर बंद झाला. तर निफ्टी १६८ अंकांनी वाढून २०,८५५ वर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांचा हा नवा उच्चांक आहे. (Closing Bell)

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, बाजारातील रेकॉर्डब्रेक कामगिरीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३.०६ लाख कोटी रुपयांनी वाढून ३४६.५१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

संबंधित बातम्या 

कमकुवत जागतिक संकेत असूनही दोन्ही निर्देशांकांनी नव्या विक्रमी उच्चांकावर सुरुवात केली होती. त्यानंतर दुपारी तेजी वाढली. अखेरच्या तासातील खरेदीने दोन्ही निर्देशांकांना दिवसाच्या उच्चांकाच्या जाण्यास मदत झाली.

दोन्ही निर्देशांक सलग सहाव्या सत्रात वाढले. निफ्टी २०,८५० पार झाला. दरम्यान, क्षेत्रीय आघाडीवर संमिश्र कल दिसून आला. पॉवर निर्देशांक ६ टक्क्यांनी वाढला. तर ऑईल आणि गॅस निर्देशांक जवळपास २ टक्क्यांनी, बँक निर्देशांक १ टक्क्याने वाढला. तर आयटी आणि रियल्टी निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाले.

मागील सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने शिखर गाठले होते. आज मंगळवारी दोन्ही निर्देशांक नवीन विक्रमी उच्चांकांवर खुले झाले होते. त्यानंतर बाजार बंद होताना दोन्ही निर्देशांकांची तेजी कायम राहिली. सेन्सेक्स आज ६९,१६८ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६९,३८१ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, एनटीपीसी हे शेअर्स सुमारे ४ टक्क्यांनी वाढले. त्याचबरोबर एसबीआय, आयसीआयसीआय बँक, टायटन, एम अँड एम, नेस्ले इंडिया, मारुती, एचडीएफसी बँक, सन फार्मा हे शेअर्स वाढले. दरम्यान, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, विप्रो, इन्फोसिस, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले. (Stock Market Closing Bell)

निफ्टीचा नवा उच्चांक

जागतिक बाजारात मंदावलेली स्थिती असतानाही आज निफ्टीने सलग सहाव्या सत्रात वाढ नोंदवून आणखी एक सर्वकालीन उच्चांक गाठला. निफ्टीने आज सकाळी २०,८०० अंकांची पातळी ओलांडली. निफ्टी बँक निर्देशांकही जवळपास २ टक्क्यांनी वाढला आणि प्रथमच ४७ हजारांच्या वर पोहोचला.

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक यांसारख्या हेवीवेट फायनान्सियल शेअर्समधील खरेदीमुळे निफ्टीमध्ये वाढ झाली, ज्यात गुंतवणूकदारांचे हित कायम राहिले.

अदानींच्या कंपन्यांचे बाजार भांडवल १२ लाख कोटींवर

गेल्या दोन सत्रांत अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर्स सुमारे ३० टक्क्यांनी वाढल्याने अदानी समूहाच्या शेअर्सचे बाजार भांडवल १२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. अमेरिकेची शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर या वर्षाच्या सुरूवातीला अदानी कंपन्यांच्या शेअर्सनी घसरणीचा सामना केला. त्यानंतर समूहाच्या शेअर्सनी १२ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. हिंडेनबर्गने अदानी समूहावर आर्थिक गैरव्यवहार आणि शेअर्समध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, अदानी समूहावर हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे अमेरिकन एजन्सीच्या अहवालानंतर आज अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स १७ टक्क्यांपर्यंत वाढले.

गेल्या दोन सत्रांमध्ये एकट्या अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सुमारे १८ टक्क्यांनी वाढले आहेत. आज मंगळवारी हा शेअर्स १० टक्क्यांनी वाढल्यानंतर काहीवेळ व्यवहार थांबवण्यात आला होता. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधील भाजपच्या विजयानंतर अदानी समूह शेअर्स ३० टक्क्यांनी वाढले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT