दौंड, पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरात सोमवारी (दि. २५) मध्यरात्री अडीच ते तीन च्या सुमारास बीएसएनएल कार्यालयात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाचा खून करण्यात आला. या सुरक्षारक्षकाचे नाव प्रकाश ठाकूरदास सुखेजा (वय 60) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील बीएसएनएल कार्यालयात रात्रीच्या सुमारास अज्ञात तीन ते चार चोरटे शिरले. हे चोरटे चोरीच्या उद्देशाने घुसले असल्याचे तेथील सुरक्षारक्षक प्रकाश ठाकूरदास सुखेजा यांच्या लक्षात आल्यावर ते हातात लाकडी दांडके घेऊन या चोरट्यांना सामोरे गेले. सुखेजा यांनी चोरट्यांना प्रतिकार केला, परंतु चोरट्यांनी धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यात तीन ते चार वार केले. हे वार इतके घातक होते, की त्यांच्या डोक्यात खोलवर जखम झाली व त्यांची कवटी देखील फुटली. त्यानंतर हे चोरटे पळून गेले.
दरम्यान, प्रकाश सुखेजा यांनी पोलिसांना मोबाईल करण्याचा प्रयत्न केला परंतु मोबाईलला रेंज नसल्याने ते संपर्क करू शकले नाहीत आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. दौंड पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही मिळते का याचा तपास पोलिस करीत आहेत.