कराड, पुढारी वृत्तसेवा : कराडमधील मारुती बुवा मठात शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह वारकरी संप्रदायातील लोकांनी हभप बंडातात्या कराडकर यांचा निषेध नोंदवला. त्यांच्या फोटोला चप्पलने मारत बंडातात्या कराडकर यांना कराड शहरात प्रवेश करू न देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शुक्रवारी सकाळी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व वारकरी संप्रदायातील काही लोक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. कराडमधील प्रसिद्ध मारुतीबुवा मठात सर्वजण एकत्र जमा म्हणून गुरुवारी सातारा येथील आंदोलनावेळी बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. बंडातात्या कराडकर यांना कराड शहरात प्रवेश करू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
राज्य सरकारने घेतलेल्या वाईनच्या बाबतीतल्या निर्णयावर राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने होत असताना साताऱ्यात बंडातात्या यांनी महिला खासदार सुप्रिया सुळे, काही खासदार-आमदार यांच्याविषयी आक्षपार्ह विधान केल्यानंतर संतापाची लाट निर्माण झाली. गुरुवारी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हजर होण्यासाठी बंडातात्या स्वतः सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, सुमारे अर्धा तास त्यांची चौकशी सुरू होती.
बंडातात्या शुक्रवारी हजर होणार असल्याने सातारा शहर, सातारा तालुका पोलिस, आरसीपी पोलिसांची एक तुकडी पाचारण करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी पोलिस मुख्यालय रस्ता दुपारी १२.३० वाजता बंद करण्यात आला होता. या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे वळवण्यात आली. अचानक यामुळे सातारकरांची तारांबळ उडाली. सुमारे दोनशे पोलिसांचा फौजफाटा असल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.
हे ही वाचलं का