सातारा, पुढारी वृत्तसेवा : तसा इकडेही उकाडा खूप वाढला आहे. थोडी थंड हवा खावी, असे वाटते. चंद्रकांतदादा जर हिमालयात जाणार असतील तर मला पण त्यांच्याबरोबर जाण्याची इच्छा आहे. दादा मला घेवून जात असतील तर दादांना सोडायला जायला काही अडचण नाही. त्यांनी त्यांच्यासोबत माझीही हिमालयाची तिकीट काढावी, असा खोचक टोला ना. जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांना हाणला. दरम्यान, मनसेचे राज ठाकरे हे नकलाकार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सातार्यात आली असता राष्ट्रवादी कार्यालयात ना. जयंत पाटील पत्रकारांशी बोलत होते. ना. पाटील म्हणाले, राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा राज्यातील 230 मतदारसंघात गेली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूरच्या 23 मतदारसंघात जाणार आहे. दि. 23 रोजी या यात्रेची सांगता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे होणार आहे.
चंद्रकांत दादा हिमालयाच्या दौर्यावर असतील का? या प्रश्नावर बोलताना ना. पाटील म्हणाले, तसेही इकडे आता खूप उकाडा वाढला आहे. त्यांनी हिमालयात जाण्याचे ठरवलेच आहे तर माझीही त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे. त्यांनी माझेही तिकीट काढावे. त्यांच्यासोबत जाण्यास माझी काहीही अडचण नाही. दादा व भाजपाचे नेते बोलेल तसे वागत नाहीत. दादांनी आता नवीन युक्तीवाद सुरू केला आहे. चंद्रकांतदादा हे आम्हाला सोयीचे प्रदेशाध्यक्ष वाटत आहेत कारण ते खूप भला माणूस आहे. भाजपाने त्यांना दिर्घकाळ ठेवलं तर फायदा होईल कारण ते माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत.
राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना ना. पाटील म्हणाले, भोंगे उतरवताना भाजपाची गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक या राज्यात असे कृत्य झाले आहे का? ते त्यांनी तपासावे. कुणाच्या हातातील ते बाहूले झालेत हे राज्याला व देशाला माहित झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्यासारखे काही नाही. ते उत्तम नकलाकार आहेत. राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडले यावर बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांसाठी प्रचंड काम केले आहे. राजू शेट्टींनी महाविकास आघाडी सोडण्याचे काहीही कारण नव्हते. त्यांनी उद्याचे भविष्य बघून निर्णय घेतला असेल, असेही ना. पाटील म्हणाले.
पक्षाच्या आढाव्यावर बोलताना ना. पाटील म्हणाले, नेते पक्षातून गेले तरी कार्यकर्ते कुठेही गेले नाहीत. मागील वेळीपेक्षा थोडीशी पडझड झाली असली तरी कार्यकर्ते संघटीतपणे काम करत आहेत. स्थानिक व जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी बैठक घेवून निर्णय घेतील. महाविकास आघाडी म्हणूनच अगामी निवडणूका लढवण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. त्यातून एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याचे वाटले तर उरलेले दोन पक्ष एकत्र येवून लढतील. यावेळी सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष सूनील माने, दिपक पवार, राजकुमार पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
धोम धरणाची आ. मकरंद पाटील यांच्यासमवेत पाहणी केली आहे. मकरंद पाटील हे त्या परिसरात पर्यटन व रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. कोयनासारखे स्कूबा ड्रायव्हिंग धोम धरणाच्या बँकवॉटरला करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत.लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.