कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजीसह परिसरात दहशतीचे साम्राज्य निर्माण केलेल्या आणि मोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर मे २०१९ पासून पसार झालेला एसटी सरकार गँगचा म्होरक्या नगरसेवक संजय तेलनाडेला पुण्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते आहे. मात्र कोल्हापूर पोलीस दलाकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळत नाही. (Sanjay Telnade)
तेलनाडे बंधूपैकी गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे याला आज शनिवारी (दि.१) सकाळी पुण्यात ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ही बातमी इचलकरंजीसह जिल्ह्यात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्याने सकाळपासूनच स्थानिक पोलिस ठाण्यातील दूरध्वनी दिवसभर खणाणत होते.
पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून अधिकृत माहिती मिळत नव्हती. संजय तेलनाडे याला सकाळी पुण्यात ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून दुपारी मिळाली आहे.
इचलकंजी शहर व परिसरात दहशत माजविणाऱ्या या गँगविरुद्ध खंडणी भूखंड फसवणूक अत्याचार आदीसह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी तेलनाडे बंधूसह गँगविरुद्ध १८ मे २०१९ मध्ये मोका अंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर तेलनाडे बंधूसह साथीदार पसार झाले होते. साथीदारांच्या वाढत्या कारनाम्यांनंतर गँगवर दुसऱ्यांदा मोका अंतर्गत कारवाई झाली होती.