थेट दुबईतून; उदय बिनीवाले : अत्यंत भावुक होऊन सानिया मिर्झाने आपल्या 20 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीला अलविदा केला. दुबई टेनिस स्पर्धेच्या दुहेरीतील अपयशी लढतीनंतर सानियाच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी सानिया म्हणाली, खेळाडू म्हणून मी जे काही करू शकले त्याबद्दल टेनिस आणि चाहते यांची ऋणी आहे. (Sania Mirza)
कोर्ट 3 वरील टेनिस खेळातील स्वतःचा शेवटचा सामना संपल्यानंतर सानियाने आपल्या भावना मोकळ्या केल्या. ती म्हणाली, खेळापासून दूर होताना फार यातना होतायत, पण आता आयुष्यात नवीन अध्याय सुरू करायचाय. सध्या मी अस्वस्थ आहे. उद्या सकाळपर्यंत अनेक वेळा रडू येईल. परंतु आयुष्यात एका टप्प्यावर असे निर्णय घ्यावेच लागतात आणि त्यातच आनंद मानावा, अशी माझी धारणा आहे (Sania Mirza)
अव्वल आणि नुकतेच दोहा स्पर्धेच्या विजेतेपदाचा मुकुट परिधान केलेल्या इगा स्विआटेकने दुबई स्पर्धेतील आपला सामना जिंकल्यानंतर क्रीडा समीक्षकांशी संवाद साधला. (Sania Mirza)
इगा म्हणाली, निकाल जसा दिसतोय तसा सोपा नव्हता. इथले कोर्ट फारच गतिमान आहे. याचा अंदाज घेऊन तत्काळ खेळात बदल केल्याने अखेर विजयी झाल्याचा आनंद होतोय. स्टेडियममध्ये पोलंडच्या प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इगाला प्रोत्साहन देत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियन ओपन विजेती अर्याना सबालेंकाने फक्त 59 मिनिटांत लॉरेन डेवीसचा 6-0, 6-1 असा फडशा पाडत आपला निर्धार स्पष्ट केला.
अर्याना म्हणाली, मला विजयी वाटचाल सुरू ठेवण्यासाठी काय करायला हवं याची पुरेपूर जाणीव झाली आहे. खेळात सातत्य ठेवायच आहे.अन्य महत्त्वाच्या सामन्यात तिसर्या मानांकित जेसीका पेगुलाने बॉगडनला 6-4, 6-3 असे सहज हरवून उपांत्यपूर्व फेरीत दिमाखाने प्रवेश केला. अमेरिकेच्या मॅडिसन कीजने व्हिकटोरिया अझारेंकाला 6-2, 6-2 असे सहज हरवून उपांत्य पूर्व फेरीचे तिकीट मिळविले.
महिला गटातील सामन्यांची वाटचाल आता अंतिम टप्प्याकडे असून साहजिकच बलाढ्य आणि तुल्यबळ खेळाडूंमधील टेनिस लढती नेत्रदीपक आणी रोमहर्षक होतील यात शंकाच नाही.
अधिक वाचा :