अकोले (नगर ): पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्वात उंच कळसुबाई शिखर व हरिश्चंद्रगड अभयारण्यातील निसर्गाच्या कुशीतील साम्रदच्या आशिया खंडातील दुसर्या क्रमांकाच्या सांदण व्हॅलीत (दरी) संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सांदण व्हॅली पावसाळ्यात बंद ठेवण्याचा निर्णय कळसूबाई, हरिश्चंद्र गड वन्यजीव विभागाने घेतला आहे. दरम्यान, पाऊस सुरू होईपर्यंत सांदण व्हॅलीत जाण्यास पर्यटकांना परवानगी मिळणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात (रविवारी) झालेल्या पावसामुळे अचानक पाण्याची पातळी वाढल्याने सांदण व्हॅलीमध्ये सुमारे 500 पर्यटक अडकले होते. वन कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.
आशिया खंडातील सर्वांत खोल दर्यांमध्ये दुसर्या क्रमांकावर सांदण व्हॅली आहे. ती पाहण्यास पर्यटक गर्दी करतात. या परिसरातील निसर्ग अविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची भंडारदरा धरण, कुलंग, अलंग, मलंगगड, कळसूबाई शिखर, रतनगड या उत्तुंग डोंगर रांगासह सांदण व्हॅली (दरी), रंधा फॉल (धबधवा), अमृतेश्वर आदी परिसरामध्ये मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक दरवर्षी मोठी गर्दी करतात, परंतु ही संधी आता आठचं दिवस राहणार आहे.
आठवडाभरच पर्यटकांना सांदण दरीत प्रवेश…
पावसाळ्यात पावसाचे पाणी सांदण व्हॅलीत जोरदार कोसळते. त्यामुळे दरवर्षी व्हॅलीत जाण्यास वन्यजीव विभागाकडून पर्यटकांना मज्जाव केला जातो. यंदा मान्सूनच्या सरी बरसायला लागल्यानंतर पर्यटकांना मनाई करण्यात येणार आहे. तोपर्यंत अर्थात येत्या आठवडाभरचं पर्यटकांना सांदण व्हॅलीत प्रवेश मिळणार आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर सांदण व्हॅली पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.
गेल्या रविवारी साम्रद गावाच्या शिवारात मुसळधार पाऊस झाल्याने सांदण दरीत पाणी वाहु लागले. सांदण दरीत सफरीसाठी उतरलेल्या पर्यटकांना पावसाचा अंदाज न आल्याने त्यांची मोठी तारांबळ उडाली. सांदण दरीमध्ये संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी रेस्क्यू टीम व ग्रामस्थांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, याहीवर्षी पावसाळ्यात पर्यटनासाठी सांदण दरी बंद राहणार आहे.
– गणेश रणदिवे, सहाय्यक वन परीक्षेत्र अधिकारी, वन्यजीव विभाग
हे ही वाचा :