File Photo  
Latest

महामार्गाला आम्ही आमचे दैवत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव दिलंय याचा गर्व – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण हे केवळ स्वप्नपूर्तीच नाही तर आजचा दिवस अभिमान, गर्वाचा आणि आनंदाचा आहे. आनंदाचा यासाठी की, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पाहिलेलं हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर मोठ्या विश्वासानं टाकली होती. मी मुख्यमंत्री असताना आज ती पूर्ण होत आहे. अभिमान यासाठी की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या महामार्गाचं (Samruddhi Mahamarg) उद्घाटन होत आहे. महाराष्ट्राच्या वतीनं मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं स्वागत करतो आणि गर्व यासाठी की या महामार्गाला आम्ही आमचं दैवत 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' यांचे नाव आम्ही दिलंय, असे मनोगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे आयोजित सभेत केले.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा'चे (Samruddhi Mahamarg) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी (11 डिसेंबर) लोकार्पण झाले. आज या  शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे,भारती पवार, खासदार कृपाल तुमाने, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवारआदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Samruddhi Mahamarg : मुंबईपर्यंतचा पुढचा टप्पाही लवकरच पूर्ण होईल

नागपूर येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेही म्हणाले की, "हा समृद्धीचा महामार्ग आहे आणि ही समृद्धी आहे ती महाराष्ट्राच्या सामान्य जनतेची. पहिल्या टप्प्यात हा रस्ता नागपूरपासून शिर्डीपर्यंतच झालेला आहे. मुंबई पर्यंतचा पुढचा टप्पाही लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर हा महामार्ग आपण नांदेड आणि गडचिरोलीपर्यंत घेऊन चाललो आहोत. त्यामुळं छत्तीसगड आणि तेलंगणा ही दोन राज्यं देखील जोडली जाणार आहेत.

या प्रकल्पाला अनेकांनी विरोध केला

या महामार्गाच्या कामात अनेक अडथळे निर्माण झाले होते. शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. अनेकांनी विरोध केला. तर, काहींनी राजकारण केले. अनेक ठिकाणी आंदोलनं सुद्धा झाली. मात्र, आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. आणि त्यांच्या मनात सरकारप्रती विश्वास संपादन केला. त्या विश्वासातूनच हा ऐतिहासिक महामार्ग आता उभा राहिला आहे. या महामार्गाचं आज लोकार्पण केलं जातंय. या महामार्गासाठी भूसंपादनही आम्ही विक्रमी वेळेत केलं. त्यासाठी भूसंपादन या कायद्यात सुधारणा केली. पाच पट मोबदला आणि तोही ताबडतोब. पैसे थेट खात्यात जमा केले. त्यामुळे या प्रकल्पात कोणीही प्रकल्पग्रस्त राहिला नाही.

पर्यावरणाचे संवर्धन करत महामार्ग उभा राहिला

पर्यावरणाचे संवर्धन करत हा महामार्ग उभा राहिला आहे. संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूला ११ लाखांपेक्षा अधिक झाडं लावण्याचं नियोजन केलं आहे, वन्य प्राण्यांसाठी आम्ही स्वतंत्र कॉरिडोर केले. रस्त्यांच्या कामात वन्य प्राण्यांच्या अधिवासाला जपण्याचा असा ठोस प्रयत्न आजवर कुठे झालेला नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं ते म्हणाले, "प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे की, गेल्या सात वर्षांत आपली अर्थव्यवस्था एका उंचीवर गेली आहे. मला अभिमान आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगतीचा मार्ग दाखवला. G20 च्या माध्यमातून जगाला एक मार्ग दाखवत आहेत."

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT