Latest

मुलाला सोडवायला आई, वडील, बहीण आले होते, पण जाताना… अंगावर थरकाप उडवणारी घटना

अमृता चौगुले

शिरूर/बारामती(पुणे); पुढारी वुत्तसेवा : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामुळे बारामतीतील काळे कुटुंबीयांवर देखील शोककळा पसरली आहे. येथील ॲड. अमर काळे यांची बहीण कांचन गंगावणे (वय ३८), त्यांचे पती कैलास गंगावणे (वय ४८) व सई गंगावणे (वय २०) या शिरुर (जि. पुणे) तालुक्यातील तिघांचाही या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी की, नागपूरहून पुण्याच्या दिशेने गंगावणे कुटुंब प्रवासासाठी विदर्भ ट्रॅव्हल्सने निघाले होते. गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय परतीच्या दिशेने निघाले होते. त्यांची बस एका ठिकाणी जेवणासाठी थांबून अर्ध्या तासाने निघाली असता समृध्दी महामार्गावर पिंपरखुटा जवळ दुभाजकाला धडकल्याने बस पलटी झाली.

याच वेळी डिझेलच्या टाकीचा स्फोट झाल्याने गाडीने पेट घेतला. यातून प्रवाशांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. काही प्रवाशी काचा फोडून बाहेर येण्यात यशस्वी होऊ शकले. गंगावणे त्यांची पत्नी आणि मुलीचा यात करुण अंत झाला. ही बातमी पहाटे आल्यानंतर काळे कुटुंबीयांना कमालीचा धक्का बसला.

साई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थीनी होती. तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. ती वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी होती. या तिघांचाही फोन लागत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर आणि अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अमर काळे यांनी शोध सुरू केला. गंगावणे हे शिक्षक असून मुलीने एमबीबीएस(MBBS) चे शिक्षण घेतले होते. मुलगी डॉक्टर झाली आता मुलाला वकील करण्याचे गंगावणे यांचे ध्येय होते. मुलगा वकील होईलही, मात्र ते पाहण्यासाठी गंगावणे या जगात नसतील याची मोठी खंत आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांनी देखील तातडीने हालचाल करून या अपघाताबाबत बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांची संपर्क साधून तातडीने माहिती घेतली. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये या तिघांचेही नाव असून त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अपघातस्थळी असल्याने हे तिघे या बसमधून प्रवास करत होते, अशा निष्कर्षाप्रत पोलीस आलेले आहेत. दरम्यान काळे कुटुंबीयांनी गंगावणे कुटुंबीय याच बसमधून प्रवास करत होते, या वृत्तास दुजोरा दिला आहे.

आमच्या कुटुंबावर हा मोठा आघात

गंगावणे यांचे बंधू सुरेश गंगावणे हे येथील विद्याधाम प्रशालेत शिक्षक असून त्यांचे दोन्ही भाचेही शिक्षक आहेत. चुलत बंधू रुपेश गंगावणे हे शिक्षण मंडळाचे माजी सभापती आहेत. आमच्या कुटुंबावर हा फार मोठा आघात असल्याची प्रतिक्रिया रुपेश यांनी दिली.

मृतदेह ओळखण्यासाठी डीएनए(DNA) टेस्ट

अपघातातील मृतदेह ओळखण्यासाठी डी एन ए टेस्ट करावी लागण्याची शक्यता आहे. गंगावणे यांचे नातेवाईक बुलढाण्याकडे रवाना झाले आहेत. निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते.

अजित पवार यांनी व्यक्त केल्या संवेदना

नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा – सिंदखेड राजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी असल्याची संवेदना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तात्काळ सुरक्षितता उपाययोजना करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT