ट्रम्प आणि ममदानी यांची व्हाईट हाऊसमधील भेट मैत्रीपूर्ण वातावरणात व्हावी, हा आश्चर्याचा धक्का होता. वांझोटा संघर्ष करण्यापेक्षा आश्वासने पूर्ण करण्यासाठी व्यावहारिक पर्याय निवडणे ही ममदानींची राजकीय गरज आहे. या शहरावर अध्यक्षीय प्रभाव कायम राखण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न असू शकतो.
अनिल टाकळकर
अ वीक इज अ लाँग टाईम इन पॉलिटिक्स, हा समजही आता कालबाह्य होत चालला आहे. राजकारणात कोणतेही अतर्क्य, नाट्यपूर्ण वळण घेण्याला आता काही क्षणार्धाचा अवधीही पुरेसा असतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि न्यूयॉर्कचे लोकशाही समाजवादी तरुण मुस्लीम, भारतीय मुळाचे नियोजित महापौर झोहरान ममदानी यांच्या व्हाईट हाऊसमधील भेटीतून हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. ही भेट आणि चर्चा अतिशय वादळी आणि आक्रमक होणार, अशी खूणगाठ बांधली जात असताना ती अनपेक्षितरीत्या सौहार्दपूर्ण संवादाची व्हावी, याचे कोणालाही आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. कारण, निवडणूक प्रचारात ज्यांनी ट्रम्प यांना ‘फॅसिस्ट’ हुकूमशहा म्हटले आणि ममदानी यांची ज्यांनी ‘वेडपट, महामूर्ख कम्युनिस्ट’ अशी संभावना केली, असे परस्परांचे कट्टर राजकीय शत्रू एकमेकांशी मैत्रीच्या भाषेत बोलतात, माध्यमांसमोर हास्यविनोद करत न्यूयॉर्कवासीयांच्या भल्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची भाषा करतात, हा चमत्कार वाटावा असाच प्रसंग होता. जे घडले ते खचितच स्वागतार्ह आहे.
राजकारणातील मतभेद वेळप्रसंगी लोकांच्या भल्यासाठी बाजूला ठेवून व्यावहारिक भूमिका घेणे किती गरजेचे असते. ममदानी हे ट्रम्प यांच्या भेटीसाठी व्हाईट हाऊसमध्ये जाणे हे सिंहाच्या गुहेत जाण्यासारखे होते; पण या दोघांनी राजकीय कौशल्य दाखवून ‘विन विन’ स्थिती निर्माण केली.
निवडणूक प्रचारात मतदारांना वारेमाप आश्वासने देऊन विरोधी नेत्याला खलनायक म्हणून रंगविणे आणि स्वतःला नायक म्हणून सादर करणे सोपे असते; पण पदाची सूत्रे हाती आल्यावर आश्वासने पूर्ण करण्यासाठी केवळ ट्रम्पविरोध पुरेसा नाही, उलट त्यांच्या सहकार्याशिवाय त्याची पूर्तता अशक्य आहे, याचे भान ममदानी यांना लवकर आले. कारण, त्यांची आश्वासने सर्वसामान्यांसाठी आकर्षक आणि गरजेची होती; पण त्यासाठी जे लाखो डॉलर्स लागणार, ते कोठून आणणार, हा प्रश्नच होता. या शहराच्या सुमारे 86 लाख लोकसंख्येत दर चार नागरिकांमागे एक जण हलाखीचे जीवन जगत आहे. त्याच्यासाठी मोफत बससेवा, मोफत बालसंगोपन आणि स्वस्त घरभाडे तसेच किफायतशीर दरातील ग्रोसरी स्टोअर्स हे सारे प्रत्यक्षात आणण्यासाठी फेडरल म्हणजे केंद्र सरकारचा दरवर्षी मिळणारा सुमारे 9.6 अब्ज डॉलर्स निधी महत्त्वाचा आहे. हा आकडा 2025 च्या आर्थिक वर्षाचा आहे. हा निधी रोखण्याची धमकी ट्रम्प यांनी मागे घेतली. दोघांचेही या शहरावर असलेले प्रेम हे या चर्चेत जमेचीच बाजू ठरली. न्यूयॉर्क हे सुरक्षित असण्यावर ट्रम्प यांचा भर आहे. त्याच्याशी त्यांनी सहमती दाखविली; पण या शहरात नॅशनल गार्ड तैनात केले आणि बेकायदेशीर स्थलांतरितांवरील मोहीम ट्रम्प प्रशासनाने अधिक तीव्र केली, तर ममदानी यांची अडचण होणार आहे.
असे मतभेदाचे काही मुद्दे असले, तरी बहुसंख्य प्रश्नांवर मतैक्य होणे, हीपण न्यूयॉर्कच्या भवितव्याच्या द़ृष्टीने आशादायक बाब आहे. घरभाडी स्वस्त व्हावीत म्हणून नव्याने गृह बांधकाम प्रकल्प उभारायला ट्रम्प राजी झाले. मूळ विचारप्रणालीशी बरेचसे इमान राखत या दोघांनी जी तडजोड केली आहे, त्यातून लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. ममदानी यांच्या करवाढ प्रस्तावालाही मर्यादा आहेत. राज्याचे गव्हर्नर आणि राज्य विधिमंडळ यांच्या अधिकार कक्षेत त्यातील बाबी येतात. या शहराच्या अंदाजपत्रकावर याचा मोठा ताण असल्याने ट्रम्प यांच्याशी सहकार्य हे या स्थितीत अपरिहार्य ठरते.
या चर्चेत ममदानी यांना बरेच काही मिळविता आले. त्यासाठी त्यांना सूर मवाळ ठेवावा लागला, तर आपण उत्तम डीलमेकर असल्याचे ट्रम्प यांना सिद्ध करता आले. विरोधी पक्षनेता प्रश्न सोडविण्याबाबत प्रामाणिक भूमिका घेणारा असेल, तर प्रसंगी राजकीय मतभेद बाजूला सारून सकारात्मक पद्धतीने त्याच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याची आपली तयारी असते, हे त्यांना यातून डेमोक्रॅटिक पक्षाला दाखवायचे आहे. यातून त्यांना आपली युनिफायरची भूमिका प्रस्थापित करावयाची असावी. ममदानी यांना सहकार्य करून फेडरल फंडिंगद्वारे ते या शहरावरील आपला प्रभाव आणि नियंत्रण कायम ठेवू शकतात. लोकांना परवडणारे जीवनमान हवे आहे. त्याविषयी आस्था असल्याचेही त्यांना आपल्या मतपेढीच्या लक्षात आणून द्यावयाचे असू शकते. त्यांनी ममदानी यांची भरभरून स्तुती केली. ते महापौर असताना न्यूयॉर्कमध्ये राहयला आवडेल, असे उद्गार काढले. ‘मला अजूनही तुम्ही फॅसिस्ट म्हणून मोकळे व्हा. दुसरे स्पष्टीकरण देण्यापेक्षा ते अधिक सोपे आहे,’ असे सुचवून पत्रकारांच्या तावडीतून ट्रम्प यांनी हसतखेळत ममदानी यांना सोडविले, हेही अतर्क्य होते. शत्रूशीही संवाद साधण्यास उत्सुक असलेला मोठ्या मनाचा उदार नेता अशी प्रतिमा या निमित्ताने करण्याची संधीही त्यांना घ्यायची असावी.
ही भेट आणि चर्चा केवळ न्यूयॉर्कपुरती मर्यादित नव्हती. कारण, अमेरिकची विभागणी ब्लू आणि रेड स्टेटस् आणि सिटीज (डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन राज्ये आणि शहरे) अशी झाली आहे. हा संघर्ष किती टोकाला पोहोचला आहे, हे सरकारी शटडाऊनवरून दिसले. ट्रम्प यांच्याशी पंगा घेतला असता, तर ममदानी यांच्या समर्थकांनी काही काळ समाजमाध्यमांवरून त्यांचे कौतुक केले असते; पण आश्वासने पूर्ण करता न येणे, हे त्यांचे अपयश ठरणार होते. ते टाळणे आणि राजकीय विचारसरणीला थोडीशी मुरड घालणे हा पर्याय त्यांनी निवडला. व्यावहारिक सहकार्य की परिणामशून्य आयसोलेशन, यातून त्यांनी रास्त पर्याय निवडणे भाग होतेच. तो नाईलाजाने घेतलेला, डावपेचाचा भागही असू शकतो. ट्रम्प हे या भेटीबाबत गंभीर होते. ममदानी यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल ते त्यांचा माध्यमांसमोर अपमानही करू शकले असते. युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांचा त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये केलेला पाणउतारा जगाने पाहिला. कदाचित त्यांचे राजकीय आडाखे असतील किंवा त्यांचा त्यादिवशी मूड चांगला असेल; पण जे घडले ते निश्चितच या शहराच्या द़ृष्टीने फलदायी आहे. भविष्यात हे सहकार्य कितपत राहील, याचे उत्तर येणारा काळच देईल. ट्रम्प यांचा लहरी आणि बेभरवशाचा स्वभाव पाहता बेकायदेशीर स्थलांतर, पोलीस, कर इत्यादी विषयांवर संघर्ष होऊ शकतो. आजचा निर्णय ते भविष्य काळात पाळतीलच, याची शाश्वती नाही; पण सद्यस्थितीत ममदानी यांच्यापुढे सामोपचाराने मार्ग काढण्याशिवाय पर्याय नाही. परवडणार्या जीवनशैलीच्या समस्यांवर एकत्र काम करता आल्यास या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे ममदानी यांचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल.