मृणालिनी नानिवडेकर
वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू सार्वजनिक मंचावर एकत्र आले. कुटुंब एकत्र आलेले पाहणे जगाला आवडते. मुंबईतील वरळी परिसरात हाजी अली दर्ग्यासमोरच्या डोममध्ये दोघे ठाकरे एकत्र आले तेव्हा तो दुर्लभ सोहळा पाहताना आया-बहिणींनी डोळ्याला पदर लावले. शिवसेनेवर प्रेम करणार्या हजारोंनी हे भावबंधन डोळ्यात साठवले. मराठीची गळचेपी होऊ नये यासाठी आयोजित केलेला मेळावा होता तो. मराठीचा जयजयकार करत मेळाव्याचे आयोजक राज ठाकरे विषयाला धरून बोलले; पण भाऊ उद्धव ठाकरे रडले, असे भाजप म्हणतेय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सगळे सुरू झालेय, मराठीचे प्रेम!
भाऊबंधनात पहिले भाषण झाले ते राज यांचे. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे म्हणजे उद्धव आणि राज यांचे वडील इंग्रजी शाळेत शिकले, त्यांच्या मराठी प्रेमावर शंका घेणार का? लालकृष्ण अडवाणी कॉन्व्हेन्ट शाळेत शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेता येईल की काय, असे बिनतोड सवाल करत त्यांनी मराठीसाठी छातीचा कोट करू, अशी भाषा केली. म्हणजे नेमके काय करणार, आजवर मराठीसाठी दिलेले लढे यशस्वी झाले का, मराठी माध्यमाच्या शाळा बंद का पडताहेत, असले प्रश्न मनात डोकावतात. पण ते विचारायचे नाहीत. कारण मग हिशेब चुकते केले जातात. तसे करताना चित्रीकरण होऊ देऊ नका, असे सांगितले आहेच. तरीही राज ठाकरे यांनी मराठीच्या विषयावर मेळावा आयोजित केला आणि ‘कोणताही राजकीय झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा’ या घोषणेला ते जागले हे मान्य करायलाच हवे.
मुंबईतल्या मराठी माणसाला ठाकरेंच्या एकत्र येण्याने काय मिळेल? रोजगाराचे प्रश्न सुटतील का? देशाच्या तिजोरीत सर्वाधिक कर जमा करणार्या या महानगरात पायाभूत सुविधांचा अभाव का? लोकलने कामाला जाणे हे लोंबकळतच हवे का या प्रश्नांची उत्तरे जनता मागेल. वैचारिक मुद्द्यांवर भलेही किती का धरसोड करेनात; राज ठाकरे ती उत्तरे द्यायचे प्रयत्न करतात, यथाशक्ती आंदोलने उभारतात! पण मुंबईचा कारभार चालविणारी महापालिका, त्या मागचा राजकीय पक्ष काय करतो? गेली काही दशके या पालिकेवर राज्य करणार्या शिवसेनेने मुंबईसाठी काय केले हा प्रश्न भारतीय जनता पक्षाने 2017 साली झालेल्या आजपर्यंतच्या शेवटच्या महापालिका निवडणुकीत केला आणि शिवसेनेला यशस्वी आव्हान दिले.
चार-सहा वॉर्ड थोडक्यात गमावले, अन्यथा बहुभाषिक भाजप संघटना पुढे गेली असती. कमळी, कमळाबाई यापुढे ऐकून घेणार नाही हे लक्षात आल्याने उद्धव ठाकरे यांनी महापालिकेनंतर वाट बदलली असे म्हणतात. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला आणि ते हाती आले नाही म्हणून थेट भाजपच्या विरोधकांशी हातमिळवणी करत महाविकास आघाडी स्थापन केली. ते स्वत: मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलणार्या या घटनेचे स्मरण होण्याचे कारण - म मराठीचा! मेळाव्यात उद्धव यांनी ‘म महापालिकेचा’ हे गृहित धरून केलेले राजकीय भाषण. राज ठाकरे मराठीचे गर्वगीत गात राहिले. मात्र त्यांचे थोरले चुलत बंधू उद्धव ठाकरे यांनी या आयोजनाचा पुरेपूर राजकीय उपयोग करून घेतला, असे बोलले जाते आहे. महाराष्ट्राचा राजकीय पट गेली पाच-सहा वर्षे सतत बदलतोय.
हिंदुत्ववादी शिवसेनेशी काँग्रेसने आघाडी केली. अल्पसंख्याक मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकणारे यशस्वी नेते म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे आशेने पाहू लागले आणि मग हे सारे पचनी न पडलेल्या महाशक्तीने महाअद्दल घडवण्याचे काम केले. गेल्या सहा वर्षांत काय काय घडले, या घटनाक्रमानंतर झालेल्या लोकसभेत महाविकास आघाडीचे समीकरण महाराष्ट्राने स्वीकारले आणि केवळ सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते समीकरण मातीमोल केले. उद्धव ठाकरे यातले काहीही विसरलेले नाहीत. वैचारिक भूमिका बदलल्याने त्यांना मिळणारी काही टक्के मते गेली, असे म्हणतात. ती कमी भरून काढण्यासाठी भावाला टाळी देणे त्यांनी स्वीकारले.
कार्यकर्त्यांनी तग धरून राहण्यासाठी हे आवश्यक असल्याचे सांगताच प्रतिस्पर्धी वाटणार्या भावाच्या मंचावर जाणे मान्य केले, असेही म्हणतात. हे उद्धव ठाकरे यांचे धोरणीपण आहे आणि राजकीय चातुर्यही! अर्थात भाजपला धडा शिकवण्यास सज्ज झालेल्या उद्धव यांना मुंबईचे वास्तव खचितच माहीत असणार. आज मुंबई शहर या नावाने ओळखल्या जाणार्या मुख्य भूमीत मराठी टक्का लक्षणीय आहे. पण मुंबई उपनगरात मराठी मतदार संख्येने निर्णायक नाही. 32 टक्के मराठी आहेत तर गुजराती, राजस्थानी, जैनही जवळपास तेवढेच 30 टक्के. काही पाहण्या सांगतात, मराठी लोकसंख्या 36 टक्के असेल. पण मतदार आहेत जेमतेम 32 टक्के व उत्तर भारतीय 18 टक्के. समाजवादी पक्षातर्फे सांगितल्या जाणार्या आकडेवारीनुसार अल्पसंख्याक मुस्लिम 14 टक्के. उरलेल्या 6 टक्क्यांत सगळे ख्रिश्चन, ज्यू, बंगाली, उडिया. मुंबईतल्या 80 वॉर्डांत मुस्लिम समुदायाची संख्या 20 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे म्हणतात. हिंदुत्वाला विरोध म्हणून ही मते उद्धव ठाकरेंकडे जातील की काँग्रेस, सपाकडे? काँग्रेस ही मते आपल्याकडे राहावी, शिवाय राष्ट्रीय राजकारणात उबाठाच्या प्रादेशिकतेचे ओझे नको म्हणून वेगळे लढणार आहे.
उत्तर भारतीय मतदार एकेकाळी काँग्रेसकडे होता. तो आता भाजपकडे सरकला आहे. गुजराती, मारवाडी, राजस्थानी, जैन ही तर भाजपची व्होट बँकच! या दोन बेरजेत 8 ते 10 टक्के मराठी मते खेचून आणली तर हे संख्याशास्त्रीय गणित भाजपला विजयी करणारे ठरू शकेल. हा पक्ष हिंदुत्वाचा व्यापक विषय हाती घेईलच. नव्या भाजपचा मंत्र विस्तारवाद आहे. 2019 साली युतीला बहुमत मिळूनही सत्ता आली नाही हे भारतीय जनता पक्षाला अजिबात रुचले नव्हते. उद्धव ठाकरेंची भूमिका दिल्लीकरांना आवडली नव्हती. ही सल मनात ठेवत भाजपने अत्यंत शांतपणे शिवसेना फोडली. बहुसंख्य आमदार थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसाला टाटा करत एकनाथ शिंदेंकडे जाऊन बसले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. युतीत असणार्या आणि युतीचे आश्वासन देणार्या दोन प्रादेशिक पक्षांनी शब्द फिरवला. भाजपने हिशेब केला. महाराष्ट्र जिंकला. राहता राहिली होती मुंबई - शिवसेनेचा प्राण. या महापालिकेची तिजोरी मोठी. मुंबईचा एकेकाळचा राजकीय धर्म शिवसेना. लोकसंख्येचे स्वरूप बदलले, परप्रांतीयांचे लोंढे इथले नागरिक झाले तसे शिवसेना आणि मुंबई हे द्वैत संकटात आले. आता ते कायम राहावे या धडपडीसाठी झाले गेले विसरून उद्धव हे राज यांना टाळी देताहेत. बाळासाहेब ठाकरेंना जे करून दाखवता आले नाही ते फडणवीसांनी करून दाखवले असे राज म्हणतात; तर अनाजीपंतांनी अंतरपाट दूर केला, असे वाक्य उद्धव नोंदवतात.
खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तील लेखातून राज ठाकरेंना आवाहन केले आहे की, दबाव टाकला आहे, सत्य काय आहे ते नंतर कळेल. शुभ मंगल होईल का सांगता येत नाही. पण प्रादेशिकतेची नांगी ठेचण्यासाठी राष्ट्रीय पक्ष हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणते झाले तर मराठी माणसाचे अपरिमित नुकसान होईल. ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’ या घोषणा पूर्वी झाल्या होत्याच. आता भाजपचे उत्तर भारतीय नेते गरळ ओकू लागले आहेत, बिहारच्या निवडणुका समोर आहेत. जे घडतेय ते वाईट आहे. मुंबईत आवाज कुणाचा याचा फैसला महापालिकेत लागणार होताच. यात एकनाथ शिंदे नगरसेवक घेऊन बसले आहेत. एकी झाली तर ठाकरे शिवसेनेला बळ मिळेल. मुंबईत मराठी माणसाच्या जगण्याला बाळासाहेब ठाकरे यांनी आधार दिला होता. ती पुण्याई ठाकरेंची जमेची बाजू आहे.