When will train travel be safe?
रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मालगाडीचा चालक आणि सहचालकाही समावेश आहे.  Pudhari File Photo
संपादकीय

सुरक्षित रेल्वे प्रवासाचे दिवास्वप्न

पुढारी वृत्तसेवा

सूर्यकांत पाठक

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने मागून धडक दिल्याने झालेले नुकसान हेच दर्शवते की, गेल्या वर्षी ओडिशातील कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातातून आपण कोणताही धडा घेतलेला नाही. कांचनजंगा एक्सप्रेस दुर्घटनेतील मृतांची संख्या अकरा असल्याचे सांगण्यात येत असून चाळीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेसच्या धडकेत 290 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला होता. हा रेल्वे इतिहासातील सर्वात मोठा अपघात होता.

टक्करविरोधी तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह

कांचनजंगा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मालगाडीचा चालक आणि सहचालकाही समावेश आहे. अपघाताचे खरे कारण तपासानंतरच कळणार असले, तरी अपघाताच्या तीन तास आधी राणीपत्र रेल्वे स्थानक ते छत्तर हाट जंक्शनदरम्यानची स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. अपघाताचे कारण शोधून जबाबदारी निश्चित करण्याचीही चर्चा आहे. बालासोर दुर्घटनेपासून धडा घेऊन रेल्वे अपघात रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलली जातील, अशी आशा यापूर्वी व्यक्त केली जात होती; पण जमिनीस्तरावर परिस्थिती बदलताना दिसत नाही. रेल्वे यंत्रणेच्या निष्काळजीपणाचे उदाहरण यावर्षी फेब्रुवारीमध्ये दिसून आले होते. कठुआ ते दसुआ (पंजाब) दरम्यान सुमारे 70 किलोमीटर अंतरापर्यंत चालकाविना मालगाडी धावताना दिसून आली. सुदैवाने या ट्रॅकवर एकही गाडी न आल्याने अपघात टळला. कांचनजंगा एक्स्प्रेस दुर्घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक कोणाच्या कारकिर्दीत अधिक रेल्वे अपघात झाले, याचे तपशील देत आहेत. रेल्वे अपघात रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टक्करविरोधी तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

गजबजलेल्या ईशान्येकडील मार्गावर त्याची अंमलबजावणी झाली असती, तर कदाचित ही दुर्घटना टाळता आली असती. मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालय गांभीर्याने पुढाकार का घेत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वे अपघात रोखणे हा सत्तेत असलेल्यांच्या प्राधान्यक्रमात का नाही? रेल्वे टक्कर टाळण्याची यंत्रणा ‘कवच’, जी टप्प्याटप्प्याने त्वरित कार्यान्वित व्हायला हवी होती; पण हे काम गोगलगायीच्या गतीने का सुरू आहे? एकीकडे देशात बुलेट ट्रेन आणि इतर हायस्पीड ट्रेनची चर्चा होत आहे. लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान मोदींनी येणार्‍या पाच वर्षांत देशाला पहिली बुलेट ट्रेन मिळेल, असे आश्वासन पुण्यातील सभेत दिले होते; पण मग सामान्य वेगाने धावणार्‍या ट्रेनलाही अपघातांपासून सुरक्षित करण्यात आपण अपयशी का ठरत आहोत? देशातील रेल्वेगाड्यांचा वेग वाढवून त्या चकचकीत आणि आलिशान करताना सामान्य वेगाच्या गाड्यांचा प्रवास सुरक्षित कसा होईल, याकडे लक्ष देण्यात कुचराई का केली जात आहे? वाढत्या लोकसंख्येच्या दबावाखाली रेल्वे सुरक्षित रेल्वे सेवा देऊ शकत नाही, हेही वास्तव आहे.

रेल्वे वाहतूक अपघातांपासून सुरक्षित करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि अधिक गुंतवणुकीची गरज आहे. भूतकाळातील अपघातांमधून धडा घेऊन कार्यप्रणाली सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपघातांची जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे, जेणेकरून अपघातांची पुनरावृत्ती रोखता येईल. अपघात टाळण्यासाठी ‘कवच’ योजना लवकरात लवकर उच्च दाबाच्या भागात राबविणे ही काळाची गरज आहे. याशिवाय ट्रॅक्सच्या देखभालीसाठी देण्यात आलेल्या निधीचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची, अपघात टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आणि नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी रेल्वे कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचीही गरज आहे. तसेच रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी आर्थिक संसाधनांची जमवाजमव करावी लागणार आहे. एकंदरीत प्रवाशांच्या सुरक्षेला रेल्वे मंत्रालय आणि सरकारचे प्राधान्य असेल तेव्हाच अपघातांची मालिका थांबेल.

SCROLL FOR NEXT