भारतीय पर्यावरणाच्या इतिहासातील एक प्रेरणादायी आणि समर्पित व्यक्तिमत्त्व, ‘वृक्षमाता’ सालूमारदा थिम्मक्का यांचे वयाच्या 114 व्या वर्षी दि. 14 नोव्हेंबर रोजी बंगळूर येथील एका खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे जाणे हे केवळ एका व्यक्तीचे जाणे नसून, निसर्गाला आपले जीवन समर्पित करणार्या एका युगाचा अस्त आहे, असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही.
थिम्मक्का यांचा जन्म दि. 30 जून 1911 रोजी कर्नाटक राज्यातील तुमकूर जिल्ह्यातील गुब्बी येथे झाला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत हलाखीची होती. घरच्या गरिबीमुळे त्यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही आणि त्यांना लहानपणापासूनच मोलमजुरी करावी लागली. त्यांचे जीवन कष्टमय असले, तरी त्यांचा स्वभाव मात्र परोपकारी आणि दयाळू होता. त्यांचा विवाह हुलिकल (ता. मगडी, जि. रामनगर) येथील चिक्कैया यांच्याशी झाला.
मूलबाळ नसल्याच्या वैयक्तिक दुःखावर मात करण्यासाठी या दाम्पत्याने झाडांनाच आपली मुले मानले आणि त्यांच्या संगोपनाला जीवनातील ध्येय बनवले. हुलिकल ते कुदूर या राष्ट्रीय महामार्गावर 1950 च्या दशकात त्यांनी प्रामुख्याने वडाच्या रोपांची लागवड सुरू केली. दुरून पाणी आणणे, झाडांना जनावरांपासून वाचवण्यासाठी काटेरी कुंपण घालणे, झाडांना स्वतःच्या मुलांप्रमाणे जपत त्यांनी 80 वर्षांत 385 वडाच्या झाडांसह एकूण 8000 हून अधिक झाडे लावली आणि जगवली. पुढे अनेकजण त्यांच्या कार्यात सहभागी झाले आणि बघता बघता त्याचे वृक्षारोपणाच्या आणि वृक्ष संगोपनाच्या चळवळीत रूपांतर झाले. या माध्यमातून कर्नाटकातील शेकडो किलोमीटरचे रस्ते वृक्षराजींनी संपन्न बनले. कन्नड भाषेत ‘सालूमारदा’ म्हणजे ‘झाडांची रांग’. म्हणून त्या ‘सालूमारदा थिम्मक्का’ या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांचे पती चिक्कैया यांचे 1991 मध्ये निधन झाले. त्यानंतरही थिम्मक्का यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. त्यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले, तसेच राष्ट्रीय नागरी सन्मान (1995), इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र पुरस्कार (1997) आणि नाडोजा पुरस्कार (2010) यांसारखे महत्त्वाचे सन्मान प्राप्त झाले. बीबीसीने त्यांना जगातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान दिले होते. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पद्मश्री स्वीकारताना त्यांनी अत्यंत प्रेमाने दिलेला आशीर्वाद आजही लक्षात राहील असा आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि चित्रपट अभिनेते पवन कल्याण या मान्यवरांनीही त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
थिम्मक्का यांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी 2014 मध्ये बंगळूरु येथे ‘सालूमारदा थिम्मक्का आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली असून ही संस्था पर्यावरण संवर्धन, शिक्षण आणि दारिपद्र्य निर्मूलनाचे काम करते. या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तीला किंवा संस्थेला त्यांच्या नावाचा पुरस्कारही या संस्थेमार्फत दिला जातो. त्यांचे दत्तक पुत्र उमेश हे या संस्थेचे अध्यक्ष असून ते त्यांचे वृक्षारोपणाचे आणि वृक्ष संगोपनाचे कार्य पुढे चालवत आहेत. त्यांच्या या कार्यात खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला, तरी ती वृक्षमाता थिम्मक्का यांना खरी श्रद्धांजली ठरेल.