वंदे मातरम् : प्रखर देशभक्तीचा आविष्कार (Pudhari File Photo)
संपादकीय

Vande Mataram 150 Years | वंदे मातरम् : प्रखर देशभक्तीचा आविष्कार

बंकिमचंद्र चटर्जी यांनी ‘वंदे मातरम्’ हे गीत लिहिले याला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. ‘वंदे मातरम्’ हे गीत मातृभूमीचे अमरस्तोत्र आहे.या गीतात मातृभूमीच्या कर्तृत्वाचे, श्रेष्ठत्वाचे आणि आदराचे चित्र रेखाटले आहे.

पुढारी वृत्तसेवा

बंकिमचंद्र चटर्जी यांनी ‘वंदे मातरम्’ हे गीत लिहिले याला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. ‘वंदे मातरम्’ हे गीत मातृभूमीचे अमरस्तोत्र आहे.या गीतात मातृभूमीच्या कर्तृत्वाचे, श्रेष्ठत्वाचे आणि आदराचे चित्र रेखाटले आहे.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

वंदे मातरम्’ असे शब्द उच्चारताच प्रत्येक भारतीयाच्या रोमा-रोमात देशभक्तीचा संचार होतो. स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम्’ असे म्हणत कितीतरी सत्याग्रहींनी ब्रिटिश साम्राज्याची शृंखला तोडण्यासाठी कारागृहाचा मार्ग पत्करला. काळ्या पाण्याची शिक्षा अनुभवली, अनेकजण त्या वेदीवर हुतात्मा झाले. या सार्‍यांच्या मागे प्रेरणा होती ती ‘वंदे मातरम्’ या गीताची, या तेजस्वी मंत्राची. या गीताची महती कितीही वर्षे उलटली, तरी ती सदैव प्रत्येक भारतीयाच्या कानात घुमत राहील.

हे मातृभूमी, तुझ्या प्रेरणेने मी नतमस्तक होतो, हे सूत्र घेऊन या गीताची बंकिमचंद्र चटर्जी यांनी ‘आनंदमठ’ या कादंबरीत रचना केली. त्यांचा प्रत्येक शब्द देशभक्तीच्या भावनेने ओथंबलेला होता आणि आपल्या पुण्यभूमी, पितृभूमी, मातृभूमी विषयी अपार कळवळा आणि प्रेम अभिव्यक्त करणारा होता. काव्य म्हणजे सहजपूर्त भावनांचा उत्कट आविष्कार असतो आणि हा आविष्कार थेट समाधी अवस्थेत प्रकट होतो, असे वर्डस्वर्थ या कवीने म्हटले आहे. काव्यातील अभिजात पुनःप्रत्ययाचा आनंद देणारा श्रेष्ठ रसास्वाद घेण्यासाठी हे सूत्र सदैव प्रेरक ठरते. सदैव नवी स्फूर्ती देते. तसेच काहीसे ‘वंदे मातरम’ या गीताचे सुद्धा आहे. 1870 मध्ये लिहिलेली आणि 1882 मध्ये ‘आनंदमठ’ कादंबरीमध्ये समाविष्ट केलेली ही रचना संस्कृतप्रचूर बंगाली भाषेत मातृभूमीची अभिव्यक्ती करते.

रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रीय महासभेच्या अधिवेशनात 1896 यावर्षी प्रथम वंदे मातरम् ही रचना गायली होती. राष्ट्रीय महासभेने याच वर्षी हे गीत, त्यातील पहिली दोन कडवी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आणि अनुसरले. 1893 यावर्षी या गीतावर आधारित एक सुंदर चित्रांकन प्रकाशित झाले होते. त्यातील समर्पकता आणि अर्थपूर्णता विहंगम आणि तेवढीच प्रेरक वाटते.

मातृभूमीचे अमरस्तोत्र

‘वंदे मातरम्’ हे एक मातृभूमीचे अमरस्तोत्र आहे. किंबहुना, जगाच्या कुठल्याही भूप्रदेशात आपल्या मातृभूमीविषयी एवढा अपार श्रद्धाभाव आणि एवढी उत्कट अभिव्यक्ती कुठेही झाली नसेल. अल्पाक्षरत्व, अर्थपूर्णता आणि अर्थसंपन्नता ही या गीताची तीन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मातृभूमीचे साक्षात चित्र प्रत्येकाच्या हृदयात करण्याचे सामर्थ्य या गीतामध्ये आहे. हे मातृभूमीचे स्तवन तर आहेच; पण त्याशिवाय त्यामध्ये मातृभूमीच्या कर्तृत्वाचे, तिच्या श्रेष्ठत्वाचे आणि आदरणीय स्वरूपाचे चित्रही रेखाटले आहे.

1905 यावर्षी वंगभंगाची चळवळ शिखरावर पोहोचली, तेव्हा हे गीत बंगालमध्ये प्रत्येक गावोगावी, पंचक्रोशीत घुमू लागले आणि सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. हा भारतीयांच्या प्रखर देशभक्तीचा अभूतपूर्व विजय होता. महर्षी अरविंद यांनी या गीताचे वर्णन राष्ट्रगीत असे केले. या गीतावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली आणि कोणीही समूहाने हे गीत म्हटले की, त्यांना तुरुंगात टाकले जाऊ लागले; पण जितका विरोध, तेवढा प्रतिकार या न्यायाने हे गीत कोट्यवधी भारतीयांच्या ओठावर घुमू लागले.ब्रिटिशांनी या गीतावर बंदी घातली, तरीही हे गीत भारताच्या हृदयातून एखाद्या कारंजीप्रमाणे सतत उसळत राहिले, प्रेरणा देत राहिले.

संविधानात समावेश : मोलाचा टप्पा

24 जानेवारी 1950 रोजी ‘वंदे मातरम्’ या गीताचा भारतीय संविधानात समावेश करण्यात आला. यावेळी भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताच्या बरोबरीने ‘वंदे मातरम्’चाही सन्मान केला पाहिजे. डॉ. प्रसाद यांचा हा विचार खरोखरच प्रेरक आणि स्फूर्तिदायक आहे. या गीताच्या सादरीकरणासाठी कला व संगीताच्या पार्श्वभूमीवर केवळ 65 सेकंद एवढा काळ लागतो.

या गीताच्या निर्मितीचे मर्म ब्रिटिश वसाहतवादी व्यवस्थेच्या शोषणात आहे. ‘आनंदमठ’ कादंबरीमध्ये बंड केलेल्या संन्याशांनी एकत्र येऊन आपल्या मातृभूमीच्या मुक्ततेसाठी गायिलेले हे गीत आहे. कादंबरीचे कथानक आणि गीताची रचना यांचा कालावधी भिन्न असला तरी लेखकाच्या अभिव्यक्तीतील साधर्म्य आणि संतुलन पाहता, तत्कालीन समाजजीवनातील वसाहतवादी सत्तेविरुद्धच्या असंतोषाचा स्फोट या गीतामध्ये झाला आहे. त्यामध्ये देशभक्ती आणि समाजाभिमुख सेवेचा आदर्श यांचा मनोज्ञ संगम झाला असल्याचे दिसून येते. हे गीत त्यामुळे भारताचे राष्ट्रगीत आहे, समाजगीत आहे आणि संस्कृतीगीत सुद्धा आहे.

लाला लजपत राय यांनी लाहोरहून ‘वंदे मातरम् या नावाचे पाक्षिक काढले होते. तसेच या काळात, 1965 मध्ये ‘वंदे मातरम्’ या नावाचा राष्ट्रीय चित्रपटही प्रदर्शित झाला होता. 1905 पासून काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात ‘वंदे मातरम्’ संपूर्णपणे म्हणण्याची प्रथा होती; पण ती पुढे कशी बंद झाली हे मात्र चिंताजनक वाटते. टिळक युगामध्ये हिंदू आणि मुस्लिम सामुदायिकपणे ‘वंदे मातरम्’ म्हणत असत. लाला लजपत राय यांच्या प्रेरणेने सबंध वायव्य प्रांतात ‘वंदे मातरम्’ हा पर्वलीचा शब्द बनला होता. 1937 यावर्षी राष्ट्रीय महासभेने ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली. पहिल्या दोन कडव्यांमध्ये मातृभूमीविषयीचा सद्भाव आहे, तर शेवटच्या दोन कडव्यांमध्ये दुर्गेचे वर्णन आहे. त्यामुळे पहिल्या दोन कडव्यास मान्यता देण्यात आली. तथाकथित वृथा धर्मनिरपेक्षवाद्यांचा हा बेगडीपणा अनेकांना पटला नाही.

‘वंदे मातरम्’ या गीताला अनेक भारतीय संगीतकारांनी आणि गायकांनी साज चढविला आहे. लता मंगेशकर, हेमंतकुमार तसेच अलीकडे ए. आर. रहमान, रविशंकर इत्यादींच्या संगीतामुळे सुद्धा हे गीत अधिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहे.

‘वंदे मातरम्’ हे गीत भारताच्या राष्ट्रीय वैभवाचे प्रतीक आहे, सुजलाम् सुफलाम् भूमीचे वैभवगीत आहे. कोटी कोटी लोकांच्या हृदयातील संस्कृतीचा आवाज आहे. सामान्य माणसाने मातृभूमीच्या वैभवाविषयी व्यक्त केलेला हा एक आत्मविश्वास आहे. जनसामान्यांच्या आशा, आकांक्षा आणि अभिव्यक्ती पल्लवित करणारे हे गीत भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक बनले आहे. हजारो क्रांतिकारकांच्या त्या सेवा आणि समर्पणाचे हे एक मूलतत्त्व आहे. धर्म, संस्कृती आणि राष्ट्राचा सन्मान याचे रक्षण करण्यासाठी हजारो हुतात्म्यांनी शहीद म्हणून रक्त सांडले. त्या रक्ताची आठवण ठेवून मातृभूमीला परिपूर्ण सुजलाम् सुफलाम् बनविणे हेच खरे महत्त्वाचे कर्तव्य होय. ‘वंदे मातरम्’चा तोच खरा संदेश होय, तोच खरा अर्थ होय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT