शशिकांत सावंत
उद्धव-राज यांच्या एकत्र येण्याच्या नव्या राजकारणामुळे महाराष्ट्रात सुरू असलेल्या नव्या चर्चा विशेषत: कोकणच्या राजकारणाला काय दिशा देणार, याकडे आता सर्वांच्या नजरा आहेत. यात मुख्य भाग हा मुंबई महापालिका निवडणुकीचा आहे. शिवसेना आणि मुंबई महापालिका हे समीकरण गेल्या 30 वर्षांचे आहे. त्यामुळे आता होणारी निवडणूक आणि दोन ठाकरेंचे मनोमिलन हा विषय मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा ठरला आहे.
दोन ठाकरे बंधूंचा 5 जुलैला निघणारा मोर्चा हिंदी सक्तीच्या आध्यादेशाच्या सरकारच्या माघारीनंतर तूर्त तरी स्थगित झाला आहे; मात्र विजयी मेळावा हे दोन्ही पक्ष घेऊ शकतात, असे आता सांगितले जाऊ लागले आहे. खरं तर, या दोन ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा गेली 4 महिने सुरू आहे. या युतीमध्ये विघ्नांची मालिकाही दिवसागणिक वाढत होती; मात्र आता मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आलेले ठाकरे बंधू एक होण्याची शक्यता वाढल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या दरबारात हजेरी लावल्यानंतर ठाकरे बंधूंची युती फिसकटेल असा एक विचार प्रवाह पुढे आला होता.
दुसर्या बाजूला भाजपनेही राज यांना साद घातली होती. सहाजिकच एकही खासदार अथवा आमदार नसलेल्या मनसेची ‘राज’दरबारात किंमत वाढत गेली. हाच मुद्दा ठाकरे बंधूंच्या युतीच्या काहीसा मुळावर आल्याचे सांगितले जाऊ लागले; मात्र मोर्चाच्या निमित्ताने झालेले मनोमिलन या चर्चांना पूर्णविराम देणारे ठरले. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित मोर्चा होण्यापूर्वी सरकारने माघार घेतली. या माघारीमुळे मोर्चातील एकीचा आविष्कार होणे थांबले असले, तरी विजयी मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत आणि त्यातूनच मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले जाईल असे आजचे वातावरण आहे.
दुसर्या बाजूला ठाण्यात सत्तारूढ महायुतीतील भाजप आणि शिंदेची शिवसेना मोठा भाऊ कोण, अशी चर्चा रंगताना दिसत आहे. हे दोन पक्ष सध्या एकत्र असले, तरी महापालिका निवडणुकीत त्यांच्या एकीवर प्रश्नचिन्ह आहे. अशा स्थितीत ठाकरे बंधूंची यूती ठाण्याच्या राजकारणातही मोठा प्रभाव दाखवण्याची शक्यता आहे. एकंदरीत कोकणात ही युती झाली, तर महायुतीला मोठे आव्हान उभे राहू शकणार आहे. मनसे आणि उद्धव सेनेची एकत्र मोर्चेबांधणी ही कोकणात तरी नव्या राजकीय समीकरणांची पायाभरणी करू शकते, हा राजकीय जाणकारांचा कयास आहे.
दोन ठाकरे बंधूंचा मोर्चा आता 5 जुलैला विजयी मेळाव्यात परावर्तित होणार आहे. 5 आकडा हा ठाकरे बंधूंना शुभ ठरून त्यांचे मनोमिलन होईल की आणखी काही, हे नजीकचा काळ ठरवेल; मात्र सध्या तरी मनसेसैनिक आणि शिवसैनिक हे वेगवेगळ्या आंदोलनाच्या रूपाने एकत्र येताना दिसत आहेत. खरं तर, मनोमिलनाच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हाच राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांतील दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र आंदोलने करू लागले होते. ठाण्यात मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरे शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांनी एकत्र आंदोलन करून या मनोमिलनाला साद दिली होती. मुंबईतही आदित्य ठाकरे आणि अमित यांच्यातही साद-प्रतिसाद दिला गेला होता. आता मोर्चाच्या निमित्ताने बंद झालेल्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या सर्व पक्षांचे मुख्य टार्गेट हे मुंबई महापालिका आहे. आंदोलनासाठी झालेले हस्तांदोलन मुंबई महापालिकेपर्यंत टिकणार का, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
राज-उद्धव एकत्र आले, तर महापालिका निवडणुकांमध्ये नवा रागरंग पाहायला मिळेल, असे सांगितले जात आहे. एका बाजूला महाविकास आघाडी शीण झालेली आहे, तर दुसर्या बाजूला महायुती बळकट झालेली आहे. यात महाविकास आघाडीला मनसे फॅक्टरची मदत झाली, तर निवडणुका तुल्यबळ होतील, असा सार्वत्रिक अंदाज आहे; मात्र हे सर्व होण्यासाठी आंदोलन ते हस्तांदोलन आणि मोर्चामिलन ते मनोमिलन ही प्रक्रिया होणे बाकी आहे.