‘ट्रम्प स्लंप’चा अमेरिकेच्या पर्यटनाला फटका  World Watch |
संपादकीय

World Watch | ‘ट्रम्प स्लंप’चा अमेरिकेच्या पर्यटनाला फटका

Trade Policy Effect Tourism | ट्रम्प स्लंप ही संज्ञा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कडक स्थलांतर, व्हिसा व व्यापार धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनावर झालेल्या झटका सूचित करण्यासाठी वापरली जाते.

पुढारी वृत्तसेवा

मुरलीधर कुलकर्णी

ट्रम्प स्लंप ही संज्ञा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कडक स्थलांतर, व्हिसा व व्यापार धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनावर झालेल्या झटका सूचित करण्यासाठी वापरली जाते. या धोरणांमुळे जागतिक पातळीवर अमेरिकेची पर्यटनस्थळ म्हणून असलेली प्रतिमा धूसर झाली आहे. कडक व्हिसा प्रक्रिया, वाढलेली सुरक्षा तपासणी आणि काही देशांवरील प्रवास निर्बंध यामुळे विदेशी पर्यटकांचा कल अन्य देशांकडे वळला आहे. जून 2025 मध्ये लास वेगासमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या 13 टक्क्यांनी घटली. जागतिक स्तरावरही त्याचे परिणाम गंभीर आहेत. 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन खर्च सुमारे 7 टक्के म्हणजेच 12.5 अब्ज डॉलरने घटून 169 अब्ज डॉलर इतका होण्याचा अंदाज वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिलने व्यक्त केला. ही अमेरिकेच्या पर्यटन खर्चातील सर्वात मोठी घट ठरली असून, अमेरिकाच असा एकमेव देश आहे ज्याच्या परकीय पर्यटन खर्चात प्रत्यक्ष घट होत आहे. संपूर्ण अमेरिकेतील परकीय आगमन सलग घटत आहे. मे 2025 पर्यंत आंतरराष्ट्रीय आगमन 2.4 टक्क्यांनी कमी झाले, तर कॅनडाहून आलेले प्रवासी 16.8 टक्क्यांनी आणि दक्षिण कोरियातून आलेले 11.3 टक्क्यांनी घटले आहेत.

लास वेगासमध्ये परिस्थिती अधिक तीव्र आहे. जून महिन्यात एकूण आगमन 11.3 टक्क्यांनी घटून 3.1 दशलक्ष झाले. पर्यटनासाठी काम करणारा कर्मचारी वर्ग अस्थिर झाल्याने हॉटेल ऑक्युपन्सी 14.9 टक्क्यांनी कमी झाली, जी सर्वात तीव्र मासिक घट मानली जात आहे. कॅनडाहून प्रवासाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. 2025 च्या मार्चमध्ये जमीन मार्गाने आलेले प्रवासी 32 टक्क्यांनी, तर विमानाने आलेले 13.5 टक्क्यांनी घटले. या पार्श्वभूमीवर णड-कॅनडा पर्यटन व्यावसायिक धास्तावले आहेत.

पर्यटन क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्याही ही घसरण अधोरेखित करत आहेत. बुकिंग डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्लेन फोगेल यांच्या मते, 2025 च्या पहिल्या 7 महिन्यांत परकीय आगमन 3.8 टक्क्यांनी घटले असून, जुलै महिन्यात 5.1 टक्क्यांची घसरण झाली आहे. नवीन व्हिसा शुल्क (उदा. 250 डॉलर ‘व्हिसा इंटेग्रिटी फी’) आणि सुरक्षेच्या कडक अटींमुळे अमेरिका आता परकीय पर्यटकांसाठी कमी आकर्षक ठरत आहे. अशा परिस्थितीत ‘ट्रम्प स्लंप’ हा केवळ लास वेगासपुरता प्रश्न नाही, तर अमेरिकेच्या संपूर्ण पर्यटन उद्योगाला व्यापणारे वास्तव आहे. यावर मात करण्यासाठी सकारात्मक धोरणात्मक बदल, व्हिसा प्रक्रियेची सुलभता आणि जागतिक आकर्षण पुनर्संचयित करण्यासाठी प्रभावी आंतरराष्ट्रीय मोहिमा या तातडीच्या गरजा आहेत. अन्यथा या उद्योगाला दीर्घकाळ गंभीर हानी होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT