अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या उलटसुलट भूमिकांमुळे या महासत्तेच्या अर्थव्यवस्थेला काय लाभले, हा संशोधनाचा विषय आहे; पण काही सर्वेक्षणांचे निष्कर्ष असे दर्शवत आहेत की, संपूर्ण जगभरात आणि अमेरिकेमध्ये ट्रम्प यांची लोकप्रियता कमालीची घसरत चालली आहे.
प्रसाद पाटील
रशिया-युक्रेन युद्धाबाबत दोन्ही देश काय निर्णय घेतील, युद्ध केव्हा संपेल किंवा सामंजस्याची परिस्थिती निर्माण होईल की नाही, हे येणारा काळ सांगेल; परंतु एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की, अमेरिकन नागरिकांनाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्णयक्षमतेवर विश्वास राहिलेला नाही. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या वेळी 81 टक्के अमेरिकन नागरिकांना खात्री होती की ट्रम्प जे निर्णय घेतील ते विश्वासार्ह आणि सुजाण निर्णय असतील. म्हणजेच 81 टक्के अमेरिकन हे मानून चालले होते की रशिया-युक्रेन युद्धाविषयी ट्रम्प जो काही निर्णय घेतील, तो योग्य व विश्वासार्ह असेल. परंतु, राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी एकामागोमाग एक तुघलकी निर्णय घेतले आणि जगातील देशांना धमकावण्याचा पवित्रा स्वीकारल्यामुळे ट्रम्प यांनी स्वतःचीच नव्हे, तर अमेरिकेचीही नाचक्की अधिक करून घेतली.
जगाचा ‘दादा’ बनण्याच्या प्रयत्नात ट्रम्प आणि अमेरिका दोघांचीही प्रतिमा झपाट्याने घसरली आहे. ट्रम्प- पुतीन भेटीनंतरही हे स्पष्ट झाले की, कोणताही ठोस निर्णय झाला नाही. जरी ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना चर्चेसाठी अमेरिकेत बोलावून भेट घेतली असली, तरी एकंदरित पाहता या भेटीनंतर अमेरिकेची निराशा झालेली दिसते. याआधीही झेलेन्स्की - ट्रम्प भेटीदरम्यान अमेरिकेची झालेली फजिती सर्वांना माहीत आहे. पुतीन झेलेन्स्की यांना भेटायला तयार झाले आणि शस्त्रसंधी झाली तरी ती कायमस्वरूपी राहील का, याबद्दल गंभीर शंका आहे.
या परिस्थितीत ‘प्यू रिसर्च’ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष ट्रम्प यांच्यासाठी लाजिरवाणेच म्हणावे लागतील. जेथे 81 टक्के अमेरिकन नागरिकांचा ट्रम्प यांच्यावर विश्वास होता, तो आता 40 टक्क्यांवर आला आहे. यातही फक्त 15 टक्के लोक पूर्णपणे ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवतात. सुमारे 59 टक्के अमेरिकन नागरिकांना आता ट्रम्प यांच्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. जगातील देश तर ट्रम्प यांच्या मनमानी वर्तनामुळे त्रस्त आहेतच, शिवाय अमेरिकन नागरिकांनाही आपल्या देशाच्या भवितव्याबाबत काहीसा काळजीचा संकेत जाणवत आहे. ट्रम्प यांनी घेतलेले एकामागून एक निर्णय त्यांना जगातील सर्वात मोठा खलनायक म्हणून उभे करत आहेत. त्यांच्या धमक्या हवेत विरून गेल्या आहेत. ट्रम्प काय म्हणतात, त्याचा कालावधी किती असेल, यावरही आता जगाला शंका वाटू लागली आहे.
ट्रम्प यांचे शुल्कवाढीच्या नावाखाली देशांना धमकावणे फार काळ चालणार नाही. ही बाब अमेरिकेला समजून घ्यावी लागेल. भारतावर 40 टक्के शुल्क लावून उलट मोदींनाच मजबूत करण्याचे काम ट्रम्प यांनी केले आहे. याआधी कॅनडाला आपले 51 वे राज्य म्हणणे, हे दादागिरीचे मोठे उदाहरण आहे. भारत-पाकिस्तानमधील ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान शस्त्रसंधी केल्याचा दावा कसा फोल ठरला, हे सर्वांनी पाहिले आहे. ट्रम्प हुकूमशाही वृत्ती स्वीकारून जगातील देशांना घाबरवण्याचा, धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र शुल्क धोरण असो वा वसाहतवादी विचारसरणी, याचा फटका अमेरिकेलाच बसणार आहे. अलीकडच्या व्हाईट हाऊस बैठकीत ट्रम्प - झेलेन्स्की यांच्यात झालेली वादळी चर्चा युरोपीय देशांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करणारी ठरली आहे. युरोपातील देश एकमुखाने युक्रेनच्या पाठीशी उभे राहू लागले आहेत आणि नव्या नेतृत्वाबाबतही विचार करू लागले आहेत.