विश्वाच्या या अनंत पसार्यात सतत असंख्य अद्भुत आणि चित्तथरारक घटना घडत असतात आणि त्यापैकी काही गोष्टींचा भूतलावरील जीवनावर परिणाम होत असतो. त्याचा शोध आणि संशोधनाच्या हेतूने जगातील अनेक देश अंतराळमोहिमा हाती घेत असतात. सोव्हिएत रशियाने 1950 च्या दशकात पहिले अवकाशयान सोडल्यानंतर हादरलेल्या अमेरिकेने प्रचंड मोठा अंतराळ प्रकल्प हाती घेतला. 1960 चे दशक संपायच्या आत अमेरिकन माणूस चंद्रावर उतरेल, अशी घोषणा तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी केली. त्यानुसार 1969 मध्ये नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरले. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांत इतकी अवकाशयाने आणि उपग्रह हवेत सोडले गेले आहेत की, त्यांची मोजदादच करता येणार नाही. संदेशवहन, दळणवळण, माहिती प्रक्षेपण या सर्व क्षेत्रांत प्रगती करायची असेल, तर अंतराळमोहिमा चालूच ठेवाव्या लागतील. या क्षमता संपादन केल्याशिवाय भारत खर्या अर्थाने समर्थ आणि समृद्ध होऊ शकणार नाही, याचे भान ठेवत ही योजना आखली गेली.
या पार्श्वभूमीवर, भारताच्या हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे रवाना झाले. भारताच्या राकेश शर्मा यांच्यानंतर 41 वर्षांनी शुक्ला यांनी अवकाशात झेप घेतली, त्यामुळे साहजिकच अवघ्या भारतात याचे कौतुकमिश्रित स्वागत झाले. पृथ्वीपासून 200 किलोमीटर अंतरावरील कक्षेत ‘ड्रॅगन’ अवकाशकुपी नेल्यानंतर, अॅक्सिओम-4 मोहिमेंतर्गत स्पेस एक्सचे फाल्कन-9 रॉकेट फ्लोरिडामधील केनेडी अवकाश केंद्रातून अंतराळवीरांना घेऊन उडाले. या मोहिमेचे सारथ्य कॅ. शुक्ला करत आहेत. हे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जातील आणि तेथे 14 दिवस राहतील. अंतराळवीरांनी त्यांच्या अवकाशकुपीचे नाव ‘ग्रेस’ असे जाहीर केले. मोहिमेत पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीरही आहेत. भारत 1984 नंतर, पोलंड 1978 नंतर आणि हंगेरी 1980 नंतर पुन्हा अवकाशात गेले आहेत. त्यामुळे या तिघांच्या द़ृष्टीने मोहिमेचे महत्त्व आगळेवेगळे आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारे कॅ. शुक्ला हे पहिले भारतीय अंतराळवीर असतील. हा प्रवास 140 कोटी भारतीयांचा आहे, अशी सार्थ प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी राकेश शर्मा 1984 मध्ये सोव्हिएत संघाच्या सॅल्यूत-7 अवकाश केंद्रात होते. ‘आम्ही सेकंदाला 7.5 किलोमीटर वेगाने पृथ्वीभोवती कक्षेत फिरत आहोत. माझ्या खांद्यावर असलेला भारताचा तिरंगा मला सांगतो की, तुम्ही एकटे नाही आहात. या प्रवासात सर्व भारतीय तुमच्यासोबत आहेत. हा केवळ माझ्या एकट्याच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील प्रवासाचा आरंभ नसून, भारताच्या महत्त्वाकांक्षी अवकाश कार्यक्रमाची सुरुवात आहे. देशातील सर्व नागरिकांनी या प्रवासाचा भाग व्हावे, ही माझी इच्छा आहे,’ अशी भावना शुक्ला यांनी व्यक्त केली आहे. एखाद्या वैज्ञानिकात अथवा अंतराळवीरात राष्ट्रप्रेमाची भावना असली, तर त्याच्यात कशी जिगर आणि ऊर्जा येते, याचेच कॅ. शुक्ला हे मूर्तिमंत उदाहरण. अंतराळातून आपला भारत ‘सारे जहाँ से अच्छा’ दिसतो, असे आपले पंतप्रधान व तमाम भारतीयांसह जगाला अभिमानाने सांगणार्या राकेश शर्मांनी 2 ते 8 एप्रिल 1981 दरम्यान टी-11 या रशियाच्या अंतरिक्षयानातून सात दिवस यशस्वी प्रवास केला आणि असा प्रवास करणारे ते पहिले भारतीय ठरले होते.
सोयुझ-टी-11 यानाने राकेश आणि दोन रशियन अंतराळवीरांना घेऊन अंतराळात यशस्वी झेप घेतली होती. नंतर या यानाच्या सॅल्यूत-7 या अंतरिक्ष स्थानकामध्ये राकेश यांनी 7 दिवस वास्तव्य केले आणि नंतर हे यान परतले होते. सॅल्यूत-7 मधून केलेल्या प्रवासादरम्यान त्यांनी उत्तर भारताची बहुवर्णीय छायाचित्रे घेतली होती. त्यावेळी हिमालयाच्या भागात जलविद्युत केंद्रे उभारण्याच्या योजना विचाराधीन होत्या. त्यासाठी त्यांनी ही छायाचित्रे घेतली होती. कॅ. शुक्ला यांनी एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये एम. टेक. केले असून, लढाऊ विमानेही चालवली आहेत.
इस्रो आणि रशियातील गागारीन कॉस्मोनॉट प्रशिक्षण केंद्रात त्यांनी शिक्षण घेतले आहे. अवकाश तंत्रज्ञानात त्यांचा मेंदू विलक्षण गतीने चालतो आणि प्रत्यक्ष ऑपरेशन्स कशी करावीत, याचे त्यांना उत्तम ज्ञान आहे. इस्रोने आरंभकाळात शेती, दूरसंचार, जलव्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद या क्षेत्रांस उपयुक्त ठरेल, अशा अवकाश तंत्रज्ञानावर भर दिला होता. आज इस्रो मंगळ आणि चांद्रमोहिमा राबवत आहे. राकेश शर्मा अवकाशात गेले होते, तेव्हा त्यांच्या तेथील अनुभवास न्याय देता येईल, एवढी वैज्ञानिक प्रगती भारताने केलेली नव्हती. आज मात्र कॅ. शुक्ला अंतराळात गेले असतानाच इस्रोने अवकाश तंत्रज्ञानात विलक्षण झेप घेतली आहे. 2027 मध्ये भारताचे ‘गगनयान’ उडणार आहे. कॅ. शुक्लांच्या या मोहिमेत सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात बियाण्यांच्या वाढीसंदर्भात मौलिक माहिती गोळा केली जाणार आहे. भविष्यात अवकाशात शेतीसाठी पर्याय शोधला जाणार आहे.
अंतराळातील धोकादायक वातावरणात कोणते जीवाणू सुरक्षित राहू शकतात, हे जाणून घेण्याचाही प्रयत्न केला जाईल. शून्य गुरुत्वाकर्षणात मानवी शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात, हे जाणून घेण्याचाही या मोहिमेत प्रयत्न केला जाणार आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा डोळ्यांवर होणार्या परिणामांवरही अभ्यास केला जाणार आहे. पृथ्वीवर आणि शून्य गुरुत्वाकर्षणात वाढणार्या पिकांच्या पोषणातील फरक समजून घेण्याबाबतही संशोधन केले जाणार आहे. युरिया आणि नायट्रेटमध्ये सायनो बॅक्टेरिया वापरून, अंतराळाच्या शून्य गुरुत्वाकर्षणात अन्न आणि ऑक्सिजन एकाच वेळी तयार करता येते का, हेही पाहण्याचा प्रयोग केला जाणार आहे. शेवटी मानवी आकांक्षा असीम आहेत. ‘आकांक्षापुढती असे गगन ठेंगणे’ असे म्हटले जाते. अंतराळयानाच्या प्रक्षेपणाच्या दिवशी कॅ. शुक्ला यांनी ‘स्वदेस’ चित्रपटातील ‘यूँ ही चला चल’ हे गाणे ऐकले. त्यांचा स्वतःचा व त्यांच्या टीमचा प्रवासही असाच आहे.