असेही स्थलांतर..!  (Pudhari File Photo)
संपादकीय

Tipeshwar Sanctuary | असेही स्थलांतर..!

Yavatmal Wildlife Sanctuary | यवतमाळ जिल्ह्यामध्ये टिपेश्वर नावाचे अतिशय सुंदर असे अभयारण्य आहे.

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ जिल्ह्यामध्ये टिपेश्वर नावाचे अतिशय सुंदर असे अभयारण्य आहे. देशभरातील समस्त वन्यजीवप्रेमींचे लक्ष टिपेश्वरवर असते. कारण, येथे कमी जागेमध्ये वाघांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. या अभयारण्याला लागून इतर जंगले असल्यामुळे वाघांचा मुक्त संचार सुरू असतो. येथील वाघ स्थलांतरासाठी प्रसिद्ध आहेत. नुकताच एक वाघ टिपेश्वर अभयारण्यातून निघून चक्क सातशे किलोमीटर प्रवास करून धाराशिव जिल्ह्यात पोहोचल्याचे आढळून आले आहे.

विदर्भातील जनतेने मराठवाड्यात येणे किंवा मराठवाड्यातील लोकांनी विदर्भात जाणे म्हणजे सारखीच परिस्थिती आहे. दोन्ही प्रदेश सर्वार्थाने मागे पडलेले आहेत. अशावेळी विदर्भातील वाघाने मराठवाड्याच्या दिशेने स्थलांतर करावे, ही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे.

विदर्भातील असो की मराठवाड्यातील असो, जनतेचा ओढा पुणे आणि मुंबईच्या दिशेने आहे. अक्षरशः लाखोच्या संख्येने लोक विदर्भातून निघून पुण्याला कायमस्वरूपी स्थायिक होण्यासाठी आलेले आहेत. तीच परिस्थिती मराठवाड्यातील लातूर, नांदेड, बीड, परभणी या भागातील लोकांची आहे. प्रचंड प्रमाणात स्थलांतर करणारे लोक या दोन प्रदेशातील आहेत.

सहसा कोणी मराठवाड्यातील व्यक्ती नागपूरला जाऊन स्थायिक झाली असे घडत नाही किंवा यवतमाळचा कोणी माणूस लातूरमध्ये जाऊन स्थायिक झाला असे होत नाही. ‘जेथे चरितार्थाची हमी तेथे आम्ही’ असा लोकांचा खाक्या असतो. याच कारणामुळे लाखोंच्या संख्येने परप्रांतीय लोकही महाराष्ट्रामध्ये येत असतात. मुंबईसारख्या ठिकाणी तर मूळ मराठी लोक किती आणि बाहेरून आलेले किती, याचे निश्चित प्रमाण समजणेसुद्धा कठीण झाले आहे.

इतके स्थलांतर मुंबईच्या दिशेने होत असते. जे ते प्रदेश विकसित झाले असते, तर लोकांना स्थलांतर करण्याची वेळ आली नसती. अशावेळी सुमारे 700 किलोमीटर प्रवास करणार्‍या या वाघाचे कौतुकच करायला हवे. पाण्याचे दुर्भीक्ष असलेल्या मराठवाडा इथे या आलेल्या या वाघाला कोणत्या भक्षाने आकर्षित केले असेल, हे त्याचे तोच जाणो. चांगल्या नोकरीच्या, जीवनमानाच्या शोधामध्ये स्थलांतर होत असते.

वाघांमध्येही अशीच प्रवृत्ती आहे. ज्या अभयारण्यामध्ये वाघांची गर्दी झाली आहे, तेथील वाघ बाहेर पडतात आणि इतरत्र जाऊन आपला निवारा शोधत असतात. तसे पाहायला गेल्यास धाराशिव जिल्ह्यामध्ये येडशी अभयारण्य आहे; परंतु तिथे वाघ किंवा बिबटे अजिबात नाहीत. या अभयारण्यामध्ये हरणांचा वावर भरपूर आहे. आम्हाला हा प्रश्न पडला आहे की, या भागात वाघ नाहीत म्हणजे स्पर्धा नाही आणि भक्ष्य म्हणजे हरणे भरपूर आहेत, हे टिपेश्वरच्या वाघाला कसे समजले असेल? कुठलाही सोशल मीडिया नसताना स्वप्रेरणेने प्राणी स्थलांतर करतात तसाच काहीसा हा प्रकार असावा, असे वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT