टेक दिग्गजांच्या सुरक्षेचा खर्च Pudhari Photo
संपादकीय

Tech Giants Security Cost | टेक दिग्गजांच्या सुरक्षेचा खर्च

Modern Security Spending | आधुनिक काळात सुरक्षेवर अधिक खर्च करणे अपरिहार्य झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

युवराज इंगवले

आधुनिक काळात सुरक्षेवर अधिक खर्च करणे अपरिहार्य झाले आहे. अशातच जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांचे प्रमुख आता केवळ व्यावसायिक नेते राहिलेले नाहीत, तर ते राजकारण, समाज आणि जनभावनांच्या थेट निशाण्यावर आले आहेत. याचमुळे त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेवरील खर्च थक्क करणार्‍या पातळीवर पोहोचला आहे. तो आता केवळ एक गरज नसून, कंपन्यांच्या ताळेबंदात एक कायमस्वरूपी जागा बनवू लागला आहे. 2024 मध्ये 10 मोठ्या टेक कंपन्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या (सीईओ) सुरक्षेवर सुमारे 369 कोटी रुपये (45 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) खर्च केले. यामध्ये सर्वात मोठा वाटा मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा आहे, ज्यावर तब्बल 221 कोटी रुपयांपेक्षा (27 दशलक्ष डॉलर्स) जास्त रक्कम खर्च झाली.

आता धोके केवळ व्यावसायिक स्पर्धक किंवा असंतुष्ट कर्मचार्‍यांपुरते मर्यादित नसून डेटाचा गैरवापर, कर्मचारी कपात, अब्जावधींची संपत्ती आणि राजकारणातील थेट हस्तक्षेपामुळे हे टेक दिग्गज सामान्य जनतेच्या रोषाचे लक्ष्य बनले आहेत. टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांच्या सुरक्षेवरील खर्चाचा संपूर्ण आकडा सार्वजनिक नाही; परंतु 2023 मध्ये टेस्लाने त्यांच्या सुरक्षेवर 21 कोटी रुपये खर्च केले होते. मस्क आता स्वतःच्या ‘फाऊंडेशन सिक्युरिटी’ कंपनीमार्फत सुरक्षेची व्यवस्था पाहतात आणि 20 बॉडीगार्डस्च्या ताफ्यासह फिरतात. अ‍ॅमेझॉन दरवर्षी जेफ बेझोस यांच्या सुरक्षेवर सुमारे 13 कोटी रुपये खर्च करते.

सध्याचे सीईओ अँडी जॅसी यांच्या सुरक्षेवरील खर्चातही कंपनी दरवर्षी वाढ करत आहे. एनव्हिडियाने 2024 मध्ये सीईओ जेन्सेन हुआंग यांच्या सुरक्षेवर 29 कोटी रुपये खर्च केले. त्यांची 13.36 लाख कोटी रुपयांची प्रचंड संपत्ती आणि एआय धोरणांमधील थेट भूमिकेमुळे त्यांच्यासाठी धोका वाढला आहे. जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डायमन यांच्या सुरक्षेवर 2024 मध्ये 7.2 कोटी रुपये खर्च झाले.

कॉर्पोरेट नेत्यांवरील हल्ले आता केवळ काल्पनिक राहिलेले नाहीत. काही अलीकडील घटनांनी संपूर्ण कॉर्पोरेट जगाला हादरवून सोडले आहे 2024 मध्ये अमेरिकन हेल्थकेअर कंपनी ‘युनायटेड हेल्थकेअर’चे प्रमुख ब्रायन थॉम्पसन यांची गोळ्या झाडून हत्या झाली. धक्कादायक बाब म्हणजे, हल्लेखोराला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला, ज्यामुळे कॉर्पोरेट नेत्यांविषयीचा जनक्षोभ समोर आला. सुरक्षेचे धोके आता केवळ सशस्त्र हल्ल्यांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. सायबर हल्ले, घरात घुसखोरी आणि डीपफेक तंत्रज्ञानाने सुरक्षेसमोर नवी आव्हाने उभी केली आहेत. अब्जावधींची संपत्ती आणि अमर्याद ताकदीमुळे हे सीईओ सोनेरी पिंजर्‍यात अडकलेत, जिथे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर अब्जावधी खर्च होत आहेत. तो भविष्यात कमी होण्याची शक्यता नाही. उलट तो अधिकच वाढत जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT